ठाणे : शुक्रवारचा दिवस ईव्हिएमचा होता. एकीकडे सुप्रीम कोर्ट ईव्हिएमवर विश्वास दाखवित असतानाच आज नांदेडमध्ये एका एमए झालेल्या युवकाने मतदान सुर असताना कुऱ्हाडीचे घाव घालून ईव्हीएमचे दोन तुकडे केले तर दुसरीकडे ठाण्याच्या निवडणूक आयोगाच्या गोदामात भंगारात सडलेल्या २७ ईव्हीएम सापडल्या. त्यातील एका ईव्हिएममशिनला तर सापाने वेटोळ घातले होते. विशेषम्हणजे ठाण्यातून २६ ईव्हिएम गायब झाल्याची तक्रार पोलिस दप्तरी धुळ खात पडली असताना आता २७ ईव्हिएम सापडल्याने चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी ठाण्याच्या या गोदामातील मशिनचा यंदाच्या निवडणूकीशी काहीही संबध नसल्याचे स्पष्ट केले. एकुणच शुक्रवार ईव्हीएमसाठी सर्वाधिक टीआरपीचा दिवस ठरला.
२७ भंगारजमा ईव्हीएम ठाण्याच्या गोदामात सापडले !
तक्रार २६ ची, सापडले २७ ईव्हिएम !
अनिल ठाणेकर
ठाणे : इंडिया आघाडी आणि एकुणच देशातील विरोधक ईव्हिएमच्या विश्वासहार्यतेवर शंका घेत असतानाच आज निवडणूक आयोगाच्या ताब्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथील गाळ्यात सापाच्या विळख्यातील भंगारजमा ईव्हीएम सापडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महत्वाचे म्हणजे २०१४ च्या निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातून २६ ईव्हीएम गायब झाल्याची तक्रार असताना २७ भंगारजमा ईव्हीएम सापडल्याने खळबळ उडाली आहे.
ठाणे महापालिकेच्या मालकीचे दादोजी कोंडदेव स्टेडियम येथील प्रेक्षक गॅलरी (स्टॅण्ड)च्या खाली काही रिकाम्या खोल्या आहेत. यातील खोलीत निवडणूक आयोगाकडून निवडणूकीशी संबंधित काही गोष्टींचा साठा करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या ताब्यातील खोलीत २०१४ च्या निवडणुकीनंतर निवडणुकीशी संबंधित काही वस्तु ठेवल्या असल्याची आठवण १० वर्षानंतर निवडणूक आयोगातील अधिकार्यांना झाली. यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी, ठाणे नगर पोलीस ठाण्यातील पोलीस, तलाठी व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्यासह येथे धाव घेत सदर खोली उघडण्याचा प्रयत्न केला. अर्धवट तुटलेल्या दरवाजाचे कुलुप चावीने उघडण्याचा प्रयत्न केला असता ते उघडले जात नसल्याने दगडाने कुलुप तोडून दरवाजा उघडण्यात आला. सदर खोलीत प्रवेश केला असता खोलीत वीजेची व्यवस्था नसल्याचे आढळून आले. मोबाईल टाॅर्चच्या उजेडात खोलीत पहाण्याचा प्रयत्न केल्यावर गंज लागलेल्या अवस्थेतील अनेक पेट्या आढळून आल्या. या पेट्या उघडल्यावर निवडणूक आयोगाच्या गोदामात सापडले. सापाच्या विळख्यातील पेटीमध्ये शेकडो तयार मतदान ओळखपत्रे, बंद लिफाफे व २७ भंगारजमा झालेले ईव्हीएम आढळून आले. महत्वाचे म्हणजे या खोलीत सापांचे अस्तित्व आढळून आले. गंज लागलेल्या पेटींवर साप फिरताना दिसत होते.
ठाणे महापालिकेकडून दादोजी कोंडदेव स्टेडियम येथील खोली २०१४ साली गोदाम म्हणून वापरण्यासाठी निवडणूक आयोगाला देण्यात आली होती. ही खोली जवळपास १० वर्षे उघडण्यातच आली नव्हती आता लोकसभा निवडणूका सुरु असताना २०२४ साली ही खोली उघडण्यात आली. यात सापडलेले शेकडो तयार मतदान ओळखपत्रांचे वाटपच झाले नसल्याचे दिसून येते आहे. २०१४ साली ठाणे जिल्ह्यातील २६ ईव्हीएम गायब झाल्याची तक्रार करण्यात आली होती. येथे तर प्रत्यक्षात भंगारजमा झालेले २७ ईव्हीएम सापडले असल्याने गायब झालेले ईव्हीएम हेच आहेत का याची चौकशी करण्याची मागणी विरोधी राजकीय पक्षांनी केली आहे. अशावेळी याची शहानिशा न करताच सापडलेले या सर्व वस्तू चक्क भंगारात विकण्याचे आदेश संबंधित यंत्रणेकडून देण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. याविषयी ठाणे जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
निवडणूक आयोगाच्या गोदामात सापडलेल्या ईव्हीएमबद्दल ट्विटरवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी, ही घटना म्हणजे काय निर्लज्जपणा चाललेला आहे ते पहा. लोकशाहीची हत्या करण्याचा हा प्रयत्न आहे, असे म्हटले आहे.