नांदेड : नांदेडच्या बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथील मतदान केंद्रात एमए शिकलेल्या एका युवकाने एन मतदान सुरु असताना व्हीव्ही पॅट आणि ईव्हीएम मशीन कुऱ्हाडीने फोडल्या.
भानुदास एडके असे या व्यक्तीचे नाव आहे. भानुदासने मतदान केंद्रात प्रवेश करत चक्क VVPAT मशीन आणि बॅलेट मशीन कुऱ्हाडीने तोडून टाकली. त्याने मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. संविधान वाचवण्यासाठी आपण हे करत असल्याचे तो ओरडत होता. त्यावेळी, मतदान केंद्रावर गृहरक्षक दलाचे कर्मचारी तैनात होते, पण त्यांचाही नाईलाज झाल्याचे दिसून आले. या फोडलेल्या मशीनमध्ये अंदाजे 500 मतदान झाले होते. पण, कंट्रोल युनिट सुरक्षित असल्याने झालेले मतदानही सुरक्षित असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
पोलिसांनी भानुदासला ताब्यात घेतले आहे . तो एमए उत्तीर्ण असून नोकरी मिळत नसल्याने तो बेरोजगार होता. नैराश्येतून त्याने हे कृत्य केले असावे असे त्याच्या निकटवर्तीयांना सांगितले.