मुंबई : कधी सागरांच्या लाटांचा तडाका तरी कधी धरणीमातेंनी घेतलेली सत्वपरिक्षा अशा अग्निदिव्यातून पुर्णत्वाच्या दिशेने निघालेला मुंबई कोस्टल रोडवरील सर्वात महत्वाचे आणि एतिहासिक असे मिशन महाकाय अखेर शुक्रवारी २६ एप्रिलच्या पहाटे 3 वाजून 25 मिनिटांनी यशस्वी झाले. या गर्डरमुळे वरळीहून नरीमन पाईंटला १० मिनिटात पोहचता येणार आहे.

मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाला सांधणारी हा महाकाय बो आर्च स्ट्रिंग गर्डर यशस्वीपणे योग्य जागी बसविण्यात आला. आता या गर्डरवर पुढील टप्प्यात सिमेंट क्राँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या गर्डरला गंज चढू नये यासाठी सी-५ या जपानी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. तसेच अतिशय प्रगत वेल्डिंग तंत्रज्ञानाद्वारे गर्डरचे सुटे भाग एकमेकांना जोडण्यात आले आहेत. त्यामुळे पुढची 15 वर्ष याला कुठल्याही देखभालीची गरज नसल्याचा कंपनीचा दावा आहे.

खुल्या समुद्रात भरती-ओहोटीचा सुयोग्य वापर करून कोणत्याही क्रेनची मदत न घेता हा गर्डर जोडण्याचं शिवधनुष्य एचसीसी कंपनीनं बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या साथीनं लिलया पेललं. भारतातील हा पहिलाच प्रयोग यशस्वी ठरल्यानं बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

पहाटे 2 वाजेपासून या कामाला सुरूवात करण्यात आली. तब्बल 30 बोईंग जेटच्या वजनाची हा गर्डर योग्य वेळी योग्य ठिकाणी ठेवणं अतिशय महत्त्वाचं होत. न्हावाशेवा येथून 2500 टनाच्या भव्य बार्जवरून हा गर्डर येथे दाखल झाला होता.  या बार्जचं दिवसाचं भाडं 50 लाख रूपये इतकं आहे.

तुळईचा अंबाला ते मुंबई प्रवास

हा गर्डर ही वरळीकडून नरिमन पाईंट दिशेला जाणाऱ्या मार्गावर स्थापन करण्यात आला आहे. दोन हजार मेट्रीक टन वजनाचा हा गर्डर असून, 136 मीटर लांब आणि 18 ते 21 मीटर रुंद आहे. हरियाणातील अंबाला इथं या गर्डरचे छोटछोटे सुटे भाग तयार करण्यात आले. तिथून तब्बल 500 ट्रेलरच्या मदतीनं हे सुटे भाग मुंबईनजीक दाखल आले. मग हे सारे सुटे भाग एकत्र जोडून नवी मुंबईतील न्हावा बंदरातून अजस्त्र तराफाच्या मदतीनं हा गर्डर वरळी येथे आणण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *