मुंबई : महाराष्ट्रात शुक्रवारी दुसऱ्या टप्प्यात झालेल्या लोकसभेच्या आठ जागांवर सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५३. ५१ टक्के मतदान झाले. काही तुरळक घटना वगळता मतदान शांततेत पार पडले. काही ग्रामस्थांनी त्यांच्या अडचणीमुळे मतदानावर बहिष्कार टाकला. काही ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने मतदानाला उशीर झाला.
निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार, संध्याकाळी ५ वाजेपर्यंत लोकसभेच्या ८जागांवर सरासरी ५३.५१% मतदान झाले. यामध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक ५६.६६%, तर हिंगोली लोकसभा मतदारसंघात सर्वात कमी ५२.०३% मतदानाही नोंद झाली . अकोल्यात ५२.४९%, अमरावतीमध्ये ५४.५०%, बुलढाण्यात ५२.२४%, नांदेडमध्ये ५२.४७%, परभणीत ५३.७९% आणि यवतमाळ-वाशीममध्ये ५४.०४% मतदान झाले.
मतदानावर बहिष्कार
अमरावती जिल्ह्यातील आदिवासीबहुल मेळघाट परिसरातील रस्ते, पाणी व विजेच्या प्रश्नावर रामबुबेली, धोकडा, कुंड आणि खामदा या चार गावातील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला. ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याने मतदान केंद्रांवर शांतता होती. प्रशासनाने ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असला तरी ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. मिळालेल्या माहितीनुसार, या चार गावांतील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट असून, तेथे वाहनाने जाणे अवघड झाले आहे. गावात वीज किंवा पाणी नाही. याबाबत ग्रामस्थांनी स्थानिक लोकप्रतिनिधींकडे अनेकवेळा तक्रारी करूनही प्रश्न सुटला नाही. तसेच परभणी लोकसभा मतदारसंघातील बलसा खुर्द या गावातील नागरिकांनी अतिक्रमणाच्या निषेधार्थ शुक्रवारी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. माहिती मिळताच जिल्हाधिकाऱ्यांनी गावात पोहोचून ग्रामस्थांची समजूत काढली आणि लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले. महिनाभरात समस्या सोडविण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळाल्यानंतर गावकर्यांनी मतदानात भाग घेतला .
