छत्रपती संभाजीनगर : सर्वात फास्ट रंग बदलणारा सरडा अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. तसेच, लाव रे तो व्हिडिओ म्हणत एकनाथ शिंदेनी भरसभेत उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ दाखवला. ज्यामध्ये, उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करत, काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला होता. जे उबाठा मोदींच गुणगान गात होते, ते मी तुम्हाला ऐकवतो, असे म्हणत व्हिडिओ दाखवला. या व्हिडिओनंतर, सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलणारा अशा शब्दात उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. रंग बदलण्यात बाप एक नंबरी, तर बेटा 10 नंबरी आहे अशी टीकाही शिंदेंनी केली .

यंदा छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत होत असून संदीपान भुमरे विरुद्ध चंद्रकांत खैरे यांच्यात थेट लढत आहे. विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांचंही आव्हान असणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रमुख उपस्थितीत संदीपान भुमरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी, मुख्यमंत्री शिंदेंनी उबाठा म्हणत उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला.

यंदाची निवडणूक देशाच्या विकासाची, प्रगतीची आणि नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्याची आहे. बाळासाहेब ठाकरेंची घोषणा होती, गर्व से कहो हम हिंदू है. अबकी बार चारसो पारमध्ये संदीपान भुमरे पहिले हवेत अशी अपेक्षा असल्याचे मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *