कर्जतच्या कृषी संशोधन केंद्रात डॉ.आंबेडकर जयंतीबद्दल अनास्था

मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली

अशोक गायकवाड

रायगड-कर्जत :महाराष्ट्र शासनाने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अमूल्य योगदानाची दखल घेत कृतज्ञता म्हणून १४ एप्रिल या त्यांच्या जन्मदिनी  शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. यावेळी जनमानसात वैचारिक प्रबोधन व्हावे,त्यांच्या ऐतिहासिक कार्याला उजाळा मिळावा, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रामाणिक इच्छा होती आणि ती त्यांनी दि.३ एप्रिल रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीत व्यक्त करून आदेशही निर्गमित केले होते. तरीही कृषी संशोधन केंद्रातील काही जातीयवादी अधिकारी व कर्मचारी  बाबासाहेबांप्रती घृणा, तिरस्कार, अनास्था व कमालीचा हलगर्जीपणा बाळगून शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात  यशस्वी झाल्याचे निदर्शनास आले आहे.

जगभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हर्षोल्लासात साजरी झाली. मात्र शासनाचे आदेश धाब्यावर बसवून कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ.बी.डी. वाघमोडे आणि कार्यालय अधीक्षक न. ल.निरडे यांनी जयंती साजरी करण्याबाबत कसलेच पाऊल उचलले नव्हते, असे लक्षात आले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, प्रस्तुत प्रतिनिधीने शासकीय आदेशानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कोणकोणत्या कार्यालयात झाली, याचा वृत्तांत घेण्यासाठी वेगवेगळ्या कार्यालयांना भेटी दिल्या. प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रात भेट दिली असता, सहयोगी संशोधन संचालक डॉ. वाघमोडे बाहेरगावी गेल्याचे कळले. कार्यालयाचे अधीक्षक न. ल. निरडे यांची भेट घेऊन त्यांना बाबासाहेबांच्या जयंतीबद्दल विचारणा करून  कार्यक्रमाचे फोटो देण्यास सांगितले असता त्यांनी सुरुवातीला डॉ.वाघमोडे हे बाहेरगावी गेले होते, असे सांगितले.नंतर बोलता बोलता डॉ.वाघमोडे १४ एप्रिल रोजी रात्री बाहेरगावी गेल्याचे सांगितले. “जयंती झाली, फोटो पी. आर.ओ. डॉ. मर्दाने कडून घ्या “, असेही बिनधास्त सांगितले. निरडे यांच्या बोलताना आडखडण्यावरून आणि देहबोलीवरून ते प्रस्तुत पत्रकाराची दिशाभूल करीत असल्याचे लक्षात आले. वास्तविक संशोधन केंद्रात पी. आर .ओ. चे पद नाही.डॉ मर्दाने हे कृषी विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ आहेत. वरिष्ठ पातळीवरून जेव्हा डॉ. मर्दाने यांना जयंती साजरी केल्याचे फोटो द्या, असे सांगण्यात आले, तेव्हा डॉ. मर्दाने हतबल झाल्याचे दिसून आले. डॉ. मर्दाने हे प्रस्तुत प्रतिनिधीला कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राच्या त्यांच्या कक्षात घेऊन गेले.त्यांच्या कक्षातील डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार होता व पेढा ठेवल्याचे निदर्शनास आले.त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या फोटोमध्ये ते स्वतः व खांडस येथील शेतकरी बळीराम ऐनकर डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर अभिवादन करताना दिसत आहेत.पण त्या दोघांव्यतिरिक्त तेथे कृषी संशोधन केंद्राचा एकही अधिकारी वा कर्मचारी उपस्थित नव्हता, हे स्पष्ट झाले. तरीही आम्ही जयंती साजरी केली, असे चक्क खोटे विधान मग्रूरीत अधीक्षक निरडे करीत होते.

जगातील विविध देशात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हर्षोल्लासात साजरी झाली. महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल,मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार ,जिल्हा परिषदे,पंचायत समिती, ग्रामपंचायत सदस्य आपापल्या कार्यक्षेत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हिरीरीने साजरी करत होते मात्र संशोधन केंद्रातील अधिकारी आणि कर्मचारी सुट्टीचा आनंद उपभोगण्यात व्यस्त होते.

या संशोधन केंद्रात मागील वर्षीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जाणीवपूर्वक साजरी करण्यात आली नव्हती. वास्तविक महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथीचे कार्यक्रम आयोजित करण्याबाबत शासनाचे परिपत्रक आहे.पण बऱ्याच कार्यालयांमध्ये त्याची अंमलबजावणी होत नाही.ज्या महापुरुषांच्या जयंतीनिमित्त शासनाने सुट्टी घोषित केली आहे, त्या दिवशी कृतज्ञता म्हणून प्रबोधनात्मक  किंवा त्यांच्या कार्याला उजाळा मिळेल, असे कार्यक्रम आयोजित करून जनजागरण करणे शासनाला अपेक्षित आहे.पण काही जात्यंध अधिकारी असे कार्यक्रम घेणे टाळतात व तो दिवशी पर्यटन, खरेदी, मनोरंजन करण्यात घालवतात. परिणामतः शासन बदनाम होते. असे कृतघ्न अधिकारी, कर्मचारी देशासाठी कलंक असल्याची भावना व्यक्त होत आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी झाली मग त्या अंतर्गत असलेल्या संशोधन केंद्रात सदर जयंती का साजरी झाली नाही? येथील अधिकारी राज्यपाल, मुख्यमंत्री ,कुलगुरू यांच्यापेक्षा मोठे आहेत का? शासकीय आदेशाला फाट्यावर मारण्याची प्रवृत्ती येथील अधिकाऱ्यांमध्ये का बळावत आहे ? कुलगुरूंचा धाक उरला नाही का ? असे प्रश्न चर्चिले जात आहेत. कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी संबंधित बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाही करावी, अशी मागणी काही डॉ. आंबेडकरप्रेमी संघटनांनी केली आहे.तसेच मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला न जुमाणणाऱ्या, त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम कार्यालयातील संबंधित बेजबाबदार व जात्यंध अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी, असे मत विविध डॉ.बाबाबासाहेब आंबेडकरप्रेमी संघटनांनी व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यावर काय कारवाई करतात, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *