पनवेल : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४च्या पार्श्वभूमीवर स्वीप कार्यक्रमांतर्गत दिव्यांग व स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांमध्ये मतदान जनजागृती करण्यात येत आहे. यासाठी महापालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनमध्ये नुकताच एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास स्वीप पथकप्रमुख शहर अभियंता संजय जगताप, दिव्यांग विभागप्रमुख प्रकाश गायकवाड, स्वप्नाली चौधरी उपस्थित होते. तसेच शुक्रवारी कामोठे येथे बचत गटांतील महिलांसाठी मतदान जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आला. या वेळी बचत गटाच्या महिलांनी रॅली काढली. प्रभाग समिती ‘ब’ हद्दीतील कळंबोली, खांदा कॉलनी, नवीन पनवेल इत्यादी ठिकाणी मतदान जनजागृतीचे बॅनर लावण्यात आले. आशा सेविकांनी सेक्टर पाच, कामोठे, साईनगर, दर्गा वाडी, नवीन पनवेल, कळंबोली येथे जनजागृती केली.