अशोक गायकवाड
रायगड : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ३२ रायगड लोकसभा मतदारसंघ अंतर्गत १९२ अलिबाग विधानसभा क्षेत्रातील मतदान प्रक्रियेसाठी प्राप्त इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची मतदान केंद्रनिहाय सुसज्जता (कमिशनिंग) पूर्ण करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली.
जे एस एम महाविद्यालय अलिबाग येथे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र कमिशनिंग प्रसंगी निवडणूक निरीक्षक ( सर्वसाधारण ) संजीव कुमार झा, निवडणूक निरीक्षक (पोलीस) श्रीमती जोयस लालरेम्मवी, जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, उपविभागीय अधिकारी मंगेश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मतदान यंत्रांची कार्यक्षमता तपासून सुसज्य करण्यात आली. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व व्हिव्हिपॅट ची कमिशनिंग ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये मतदान यंत्र घटक योग्य कार्य करत आहेत याची खात्री करण्यासाठी चाचणी केली जाते. कमिशनिंग प्रक्रियेमध्ये नियोजन, निवडणूक उमेदवार- चिन्ह, मतदान केंद्रनिहाय प्रमाणीकरण सुसज्जता समाविष्ट आहे. यंत्र घटक जसे पाहिजे तसे काम करत आहेत याची खात्री करणे हा देखील कमिशनिंगचा उद्देश आहे. यावेळी प्रक्रिया पूर्ण करून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व व्हिव्हिपॅट स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आली. स्ट्राँग रूमची सुरक्षा सुव्यवस्थेच्यादृष्टीने २४ X ७ पॉवर बॅकअप, सशस्त्र बंदोबस्त आराखडा, पोलीस आदी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार करण्यात करण्यात आल्या आहेत.
