दिवा, दि. २२ एप्रिल (आरती परब) : मान्सून तोंडावर आला असतानाही दिवा शहरातील नालेसफाईचे काम अद्याप सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ठाणे महानगरपालिका प्रशासनाकडून मान्सूनपूर्व तयारीचा गाजावाजा केला जात असला, तरी प्रत्यक्षात दिव्यातील परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याचे चित्र दिसत आहे.

महापालिकेकडून आयुक्तांच्या आढावा बैठका, प्रभागनिहाय निर्देश आणि कामांच्या दाव्यांची माहिती प्रसिद्धी माध्यमांतून दिली जात आहे. मात्र, दिव्यातील मुख्य नाल्यांमध्ये कचऱ्याचे ढीग आणि साचलेला गाळ कायम असल्याने प्रत्यक्ष कामाचा अभाव स्पष्टपणे जाणवत आहे. त्यामुळे प्रशासनाचा ‘आढावा’ हा केवळ कागदापुरताच मर्यादित असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.

दरवर्षी नाले सफाईसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो. तरीही पावसाळ्याच्या अगोदर केवळ वरवरची सफाई करून काम पूर्ण झाल्याचे दाखवले जाते, असा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. परिणामी, नाल्यातील गाळ न काढल्यामुळे पहिल्याच पावसात पाणी साचून पूरसदृश परिस्थिती निर्माण होते आणि नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते.

दरम्यान, हवामान खात्याने पुढील काही तासांत ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. अशा परिस्थितीत नालेसफाई रखडल्यामुळे दिवा शहर पुन्हा पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त होत आहे. “दरवर्षी प्रशासन फक्त बैठका घेते, पण प्रत्यक्षात काहीच होत नाही. कंत्राटदार वरवरची सफाई करून निघून जातात. यंदाही तीच परिस्थिती राहिली, तर नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याला जबाबदार कोण?” – दर्पण गावडे, स्थानिक नागरिक, दिवा

मान्सूनपूर्व कामांबाबत प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या आश्वासनांवर आता नागरिकांचा विश्वास उरलेला नाही. त्यामुळे तातडीने प्रभावी नालेसफाई करून संभाव्य पूरस्थिती टाळण्याची मागणी जोर धरत आहे.

००००००००००००

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *