ठाणे, : ठाण्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात लग्नाच्या नोंदणीसाठी आलेल्या नववधू-वरांसह वऱ्हाडींमध्ये येत्या 20 मे रोजी मतदान करण्याचे आवाहन 25 ठाणे-लोकसभा मतदार संघांतर्गत 148 -ठाणे विधानसभा मतदार संघ स्वीपच्या टीमने केले.

सध्या लग्न सोहळ्यांची धामधूम सुरू आहे. त्यामध्ये जमणाऱ्या हजारोंच्या गर्दीचा लाभ मतदानविषयक जनजागृतीसाठी उठवला जात आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी येत्या २० मे रोजी मतदान होत आहे. या वेळी मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी 25 ठाणे-लोकसभा मतदार संघांतर्गत 148 -ठाणे विधानसभा मतदार संघ स्वीप अंतर्गत मतदान जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात येत आहेत.

दुय्यम निबंधक हे विशेष विवाह नोंदणीचे काम करतात. दुय्यम निबंधक कार्यालयात विवाह नोंदणी करण्यासाठी नववधू-वर व वऱ्हाडी यांची नेहमीच वर्दळ असते. त्यात आज रविवार हा सार्वजनिक सुट्टीचा दिवस खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. याचेच औचित्य साधून स्वीप टीमने दुय्यम निबंधक कार्यालय येथे सहा.निवडणूक अधिकारी उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व दुय्यम निबंधक श्रीमती. राऊत यांच्या उपस्थितीत मतदान जनजागृती कार्यक्रम घेतला होता.

विवाह नोंदणी करण्यासाठी ठाणे शहरातील नववधू-वर व वऱ्हाडी दुय्यम निबंधक कार्यालयात आले होते. त्या सर्वाना मतदान टक्केवारी कशी वाढेल या विषयी मार्गदर्शन व जनजागृती करण्यात आली. तसेच मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे यांची जाणीव त्यांना करून देण्यात आली. प्रत्येक नागरिकांनी कोणत्याही आमिषांना बळी न पडता मतदानाचा अधिकार बजावावा. लोकशाहीच्या उत्सवात मतदानाच्या दिवशी आपली सर्व कामे बाजूला ठेवून उज्वल भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी व सर्वानी आपल्या कुटूंबातील सदस्यांना, नातेवाईकांना व राहत असलेल्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावे. सर्वानी न चुकता दिनांक २० मे २०२४ रोजी अवश्य मतदान करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात आलेल्या सर्व वऱ्हाडींकडून ‘मी मतदान करणारच’ असे अभिवचन घेण्यात आले.

यावेळी नवीन घरात सून म्हणून प्रवेश करताना भारतीय नागरीक आणि ठाणे शहरातील सजग मतदार म्हणून मतदान करेल. नागरिकांनीही मतदानात सहभाग घ्यावा, असे नववधू समिक्षा मंचेकरने सांगितलं आहे.

संसाराच्या कर्तव्यासोबत मी देशाप्रती असणारे कर्तव्यही पार पाडणार आहे आणि मतदान करणार आहे, असे नवीनच लग्न झालेले हर्षद सावंत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *