दिवा: किम्स हॉस्पिटल्स, ठाणे येथे करण्यात आलेल्या अत्याधुनिक कीहोल स्पाइन सर्जरीनंतर ७३ वर्षीय रुग्णाने अवघ्या १२ तासांत पुन्हा चालण्यास सुरुवात केली. गेल्या महिनाभरापासून तीव्र पायाच्या वेदनांमुळे त्याला दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ उभे राहणे किंवा चालणे शक्य नव्हते. रुग्णाला पायात तीव्र वेदना होत होत्या, ज्या दिवसेंदिवस वाढत गेल्या. त्यामुळे दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम झाला होता. रुग्णालयात दाखल होण्याच्या दोन दिवस आधी त्याला मल-मूत्र नियंत्रणाशी संबंधित समस्या देखील निर्माण झाल्या, ज्यामुळे परिस्थिती गंभीर बनली.
तपासणीत L४–L५ स्तरावरील प्रोलॅप्स्ड डिस्क आढळली. या अवस्थेत मणक्यातील डिस्क सरकून मज्जातंतूवर दबाव आणते, ज्यामुळे तीव्र वेदना, मुंग्या येणे आणि चालण्यात अडचण निर्माण होते. रुग्णाला इतरही सहव्याधी होत्या तसेच तो रक्त पातळ करणारी औषधे घेत होता. त्यामुळे पारंपरिक ओपन सर्जरीमध्ये जास्त रक्तस्रावाचा धोका होता. हे लक्षात घेऊन डॉ. अमोघ झावर, कन्सल्टंट स्पाइन सर्जन यांच्या नेतृत्वाखाली एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या किमान हस्तक्षेप शस्त्रक्रियेत छोट्या छिद्रांद्वारे कॅमेरे आणि विशेष उपकरणांच्या सहाय्याने मज्जातंतूंवरील दबाव कमी करण्यात आला. डॉ. अमोघ झावर म्हणाले, “एंडोस्कोपिक स्पाईन सर्जरीमुळे प्रभावित भागावर अचूक उपचार करता येतात आणि स्नायूंना कमी इजा होते. विशेषतः वृद्ध आणि उच्च-जोखमीच्या रुग्णांसाठी ही पद्धत अधिक सुरक्षित आहे.”
शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती झपाट्याने सुधारली. तो १२ तासांत चालू लागला आणि ४८ तासांत रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तज्ज्ञांच्या मते, एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरीमुळे कमी वेदना, कमी रक्तस्राव, कमी संसर्ग धोका आणि जलद पुनर्प्राप्ती असे अनेक फायदे मिळतात. या प्रकरणामुळे अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या मदतीने वृद्ध रुग्णांनाही पुन्हा स्वावलंबी व सक्रिय जीवन जगणे शक्य होत असल्याचे अधोरेखित झाले आहे.
