ठाणे: २५ एप्रिल हा दिवस ठाणे महानगरपालिकेअंतर्गत जागतिक हिवताप (मलेरिया) दिन म्हणून राबविला जातो. या दिनी महापालिकेच्या फायलेरिया विभागाच्यावतीने महापौर शर्मिला पिंपळोलकर व आयुक्त सौरभ राव यांनी हिवताप टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरात स्वच्छता राखावी व प्रशासनाने केलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन केले आहे.
हिवताप टाळण्यासाठी घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नये, टाक्या, भांडी, टायर, कूलर आदी ठिकाणी साठलेले पाणी नियमितपणे साफ करावे. आठवड्यातून किमान एकदा पाण्याची भांडी रिकामी करून स्वच्छ ठेवावीत. तसेच, डासांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी खिडक्या व दरवाजांना जाळी लावावी आणि रात्री झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा, वैयक्तिक संरक्षण व डास नियंत्रणासाठी शरीर झाकणारे कपडे व डास प्रतिरोधक क्रिम/ लोशन/ स्प्रे इ.चा वापर करावा. तसेच डास नियंत्रणासाठी किटकनाशक फवरणी असेही आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
ताप, अंगदुखी, डोकेदुखी, थंडी वाजून ताप येणे किंवा उलट्या आढळल्यास त्वरित जवळच्या महानगरपालिका आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. सर्व आरोग्य केंद्रांमध्ये मोफत तपासणी व औषधोपचाराची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून हिवतापाची (मलेरिया) लक्षणे आढळल्यास आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.
