ठाणे : ठाणे स्टेशन जवळील सॅटीस उड्डाणपुलावर दुपारी १:२८ वाजताच्या सुमारास महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची शिवशाही एसी बस क्रमांक- MH ०९ EM ९९४२, (चालक श्री. संतोष किसन गवळी, वाहक – मिलिंद सोनावणे, मार्ग – स्वारगेट ते वसई.) या बसला ठाणे रेल्वे स्टेशन बस स्थानक येथून वसईला जाताना सॅटिस ब्रिजवरती आग लागली होती. प्रसंगी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वाय. एम. तडवी, ठाणे नगर पोलीस कर्मचारी, ठाणे नगर वाहतूक पोलीस कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान १-फायर वाहनासह, १-रेस्क्यू वाहनासह, १- वॉटर टँकर वाहनासह, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी १-पिकअप वाहनासह व महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे कर्मचारी उपस्थित होते.
सदर आग लागलेली बस ही वसई बस डेपोची असून बस मध्ये स्वारगेट वरून वसईला जाणारे १० प्रवासी व ठाणे येथून ४ प्रवासी असे एकूण १४ प्रवासी प्रवास करत होते. सदर बसला आग लागताच सर्व प्रवासी व बसचे चालक व वाहक सुरक्षित बसच्या बाहेर आले त्यामुळे अनर्थ टळला परंतू शिवशाही बस पूर्णतः जळून नुकसान झाले आहे. सदर आग लागलेल्या बस मधील डिझेल व ऑइल रस्त्यावरती पसरले होते त्यावरती आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने माती पसरविण्यात आली.
