नवी मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे यंग स्पोर्ट्स क्लब-घाटकोपर सहकार्याने शालेय मुलांसाठी मोफत कबड्डी स्पर्धात्मक मार्गदर्शन शिबीर २७ एप्रिलपासून माणिकलाल मैदान-घाटकोपर येथे सुरु होत असून शालेय ४० खेळाडू सहभागी झाले आहेत. नवोदित खेळाडूंना तंत्रशुध्द कबड्डी खेळाची प्राथमिक ओळख करून देत दुखापतीच्या भयाचे निराकरण करण्याचा उद्देश देखील आहे. परिणामी कबड्डी खेळाकडे शालेय खेळाडूंमध्ये कबड्डी खेळाचा प्रसार आणखी अधिक जोमाने होईल.
समता विद्या मंदिर, माणिकलाल म्युनिसिपल स्कूल, तुलीप हायस्कूल, अभ्युदय विद्यालय आदी शाळांमधील बहुतांश खेळाडूंच्या उत्स्फूर्त प्रतिसाद व सोयीच्या आग्रहास्तव घाटकोपर-पश्चिम येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर उपक्रमात वॉर्म अप व कबड्डी कौशल्यावर भर देण्यासाठी अनुभवी कबड्डीपटू व मार्गदर्शक सुनील खोपकर आणि त्यांचे सहकारी सुशांत खळे व सक्षम म्हात्रे उत्सुक आहेत. दोन दिवसीय शिबिरामधील उत्कृष्ट शालेय ४ खेळाडूंना विशेष पुरस्कार देऊन माजी कबड्डीपटू गोविंदराव मोहिते, कबड्डीप्रेमी विजय चव्हाण, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदी मंडळींच्या प्रमुख उपस्थितीत गौरविण्यात येणार आहे.
००००००००
