– रत्नदीप स्पोर्ट्स असोसिएशन टी-२० क्रिकेट स्पर्धा
हर्ष घरसून ‘मॅन ऑफ द मॅच’ आणि ‘मॅन ऑफ द टूर्नामेंट’
मुंबई :रत्नदीप स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित टी-२० टूर्नामेंट २०२५-२६ चा अंतिम सामना एमटीएनएल आणि ऍडव्हान्स क्रिकेट क्लब या दोन बलाढ्य संघांमध्ये रंगला. अत्यंत चुरशीच्या आणि उत्कंठावर्धक झालेल्या या लढतीत एमटीएनएल संघाने ४ धावांनी विजय मिळवत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या एमटीएनएल संघाने सुरुवातीला संयमी खेळ करत नंतर आक्रमक फलंदाजीचा अवलंब केला. संघाने निर्धारित २० षटकांत ५ गडी गमावत १६४ धावांचा स्पर्धात्मक स्कोअर उभारला. या डावात हर्ष घरसून याने उत्कृष्ट फलंदाजी करत ५१ चेंडूत ७४ धावांची शानदार खेळी केली. त्याला यश परब याची भक्कम साथ लाभली. यशने ४६ चेंडूत ५४ धावा करत दोघांनी मिळून १२५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. या भागीदारीमुळे एमटीएनएलला मजबूत पाया मिळाला. ऍडव्हान्स क्रिकेट क्लबकडून रोहन ठाकूर याने अचूक मारा करत ४ षटकांत २७ धावा देत २ बळी घेतले.
१६५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऍडव्हान्स क्रिकेट क्लबनेही दमदार सुरुवात केली. त्यांच्या फलंदाजांनी वेळोवेळी आक्रमक फटकेबाजी करत सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार ठेवला. मात्र, एमटीएनएलच्या गोलंदाजांनी निर्णायक क्षणी अचूक आणि नियंत्रित गोलंदाजी करत प्रतिस्पर्ध्यांवर दबाव कायम ठेवला. ऍडव्हान्स संघ २० षटकांत ६ बाद १६० धावांपर्यंतच मजल मारू शकला आणि एमटीएनएलने ४ धावांनी थरारक विजय मिळवला.
या विजयात धनंजय केणी याने मोलाचा वाटा उचलला. त्याने ४ षटकांत ३६ धावा देत ३ महत्त्वाचे बळी घेत सामन्याचे पारडे एमटीएनएलच्या बाजूने झुकवले. अंतिम षटकांमध्ये त्याच्या गोलंदाजीने सामना निर्णायक वळणावर आणला.
या संपूर्ण स्पर्धेत अनेक खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. अंतिम सामना विशेषतः रंगतदार ठरला असून क्रिकेटप्रेमींना एक अविस्मरणीय अनुभव मिळाला. एमटीएनएल संघाच्या या विजयामुळे त्यांच्या संघभावना, सातत्यपूर्ण कामगिरी आणि निर्णायक क्षणी दाखवलेल्या संयमाचे पुन्हा एकदा कौतुक झाले.
सामन्यातील उत्कृष्ट फलंदाजीबद्दल हर्ष घरसून याला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार देण्यात आला. तसेच संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरी केल्याबद्दल त्यालाच ‘मॅन ऑफ द टूर्नामेंट’ पुरस्काराने गौरविण्यात आले. बेस्ट बॅटर म्हणून हेत पटेल, तर बेस्ट बॉलर म्हणून मानस चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला.
स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संदीप चव्हाण (अध्यक्ष, मुंबई मराठी पत्रकार संघ), स्वाती घोसाळकर (उपाध्यक्ष, मुंबई मराठी पत्रकार संघ) आणि दीपेन पारीख(अपेक्स बॉडी सदस्य, मुंबई क्रिकेट असोसिएशन) उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या आणि उपविजेत्या संघांना चषक व पारितोषिके प्रदान करण्यात आली.
