उल्हासनगर महापालिका आयुक्त आणि ठेकेदारात बैठक
उल्हासनगर – महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी महापालिका ठेकेदारांची बैठक घेऊन त्यांच्या समस्या एकून घेतल्या. तसेच पावसाळ्यापूर्वी अर्धवट कामे पूर्ण करण्याचे निर्देश देऊन यापुढे रस्ते न खोदण्याच्या सूचना आयुक्तांनी ठेकेदाराला दिल्या आहेत.
उल्हासनगर महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी शुक्रवारी महापालिका सभागृहात कंत्राटदार व ठेकेदार असोसिएशनची बैठक बोलाविली होती. पावसाळा तोंडावर आला असून त्यापूर्वी शहरातील विकास कामे पूर्ण करा. असा सूचना आयुक्तांनी ठेकेदाराला केले. तसेच त्यांच्या समस्या एकून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. महापालिका बांधकाम विभागामार्फत रस्त्याची तर पाणीपुरवठा विभागामार्फत मलनिस्सारण योजनेची कामे सुरू आहेत. दोन्ही विभागाने एकमेकांशी समन्वय ठेवून कामे केल्यास समस्या निर्माण होणार नाही. असा सल्ला महापालिका अधिकाऱ्यांसह ठेकेदारांना आयुक्त शेख यांनी दिला. पावसाळ्यापूर्वीची कामे वेळेत करण्यात यावीत, तसेच नवीन खोदकाम करण्यात येवू नये, रस्त्यावर धूळ होणार नाही. याची खबरदारी घ्यावी, नागरिकांना वाहतूक कोंडीची त्रास होणार नाही. यासह दक्षता व सुरक्षा विषयक साधनांचा वापर करावा. अशा सूचना यावेळी आयुक्तांनी ठेकेदाराला दिल्या आहेत.
महापालिका ठेकेदाराच्या बैठकीत आयुक्त अजीज शेख यांच्यासह अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, मुख्य लेखाधिकारी किरण भिलारे यांनी ठेकेदारांच्या समस्यांबाबत आढावा घेतला. यावेळी उपायुक्त किशोर गवस, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता तरुण शेवकानी, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे, ठेकेदार असोसिएशनचे अध्यक्ष राजेश लडाख, सोनु खटवाणी, शशी जगत्यांनी, प्रभु चंद्राणी यांच्यासह अन्य ठेकेदार उपस्थित होते. पावसाळ्यापूर्वीची कामे पूर्ण करण्यासाठी नियमित आढावा घेतला जाणार असेही आयुक म्हणाले.