ड्रिल करून इंजेक्शन सदृश्य द्रव्य टाकल्याचा संशायास्पद प्रकाराने खळबळ
कल्याण : कल्याण पश्चिमेतील गणपती चौक ते डी बी चौक दरम्यान असलेल्या टँबेबुइया झाडांवर अज्ञात व्यक्तींनी ड्रिल मारून इंजेक्शनसदृश्य द्रव्य टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या धक्कादायक प्रकराचा व्हिडीओ सोशल मिडिया वर व्हायरल झाल्याने घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पर्यावरणप्रेमींमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
कल्याण पश्चिम गणपती चौक ते डी बी चौक दरम्यान असलेल्या सात ते आठ टँबेबुइया झाडांच्या खोडांमध्ये ड्रिल मशीनच्या सहाय्याने छिद्रे करण्यात आली होती. या छिद्रांमधून काही द्रव्य इंजेक्ट केल्याचा संशय व्यक्त केला जात असून झाडांना जाणीवपूर्वक नुकसान पोहोचवण्यात आल्याच्या चर्चा रंगल्या असून घटनेची माहिती मिळताच कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
संबंधित झाडांची पाहणी करण्यात आली असून या प्रकारामागे नेमके कोण आहे याचा शोध घेतला जात आहे. अज्ञात व्यक्तींविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकारी सुत्रांनी माहिती दिली. शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या आणि पर्यावरणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या झाडांवर अशा प्रकारे हल्ला झाल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दोषींना तात्काळ शोधून कठोर कारवाईची मागणी यानिमित्ताने जोर धरू पाहत आहे.
केडीएमसी मुख्य उद्यान अधिक्षक संजय जाधव यांच्या शी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, घटनास्थळी जात पंचनामा करीत त्याअंती याप्रकरणी गुन्हा दाखल करणार आहोत. तर केडीएमसी महापौर हर्षाली चौधरी यांनी या घटनेची दखल घेत चौकशी, कारवाई चे आदेश दिले असल्याचे संपर्क साधला असता सांगितले.
