अंथरुणाला खिळलेल्यांसाठीही विशेष सेवा
रमेश औताडे
मुंबई : वाढते शहरीकरण, तुटत चाललेली संयुक्त कुटुंब व्यवस्था आणि वृद्धांकडे होणारे दुर्लक्ष या पार्श्वभूमीवर गुजरातमधील राजकोट येथे उभारण्यात आलेला “सद्भावना वृद्धाश्रम” अनेक निराधार वृद्धांसाठी आशेचा किरण ठरत आहे. “जगातील सर्वात मोठा वृद्धाश्रम” असा दावा करण्यात आलेल्या या प्रकल्पामध्ये निराधार, आजारी, अंथरुणाला खिळलेले तसेच कर्करोग आणि कोमाग्रस्त वृद्धांना पूर्णपणे मोफत निवारा, वैद्यकीय उपचार आणि मानवी आधार दिला जात आहे. विनुभाई बघुभाई नारोळा यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या वृद्धाश्रमात वृद्धांना केवळ राहण्याची सोय नाही, तर त्यांना सन्मानाने जगण्याची संधी दिली जात आहे. तब्बल ४०० खाटांची व्यवस्था असलेल्या या प्रकल्पात सध्या ७०० हून अधिक ज्येष्ठ नागरिक राहत असून, अनेक वृद्धांना आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात माणुसकीचा आधार मिळत आहे.
वृद्धाश्रमामध्ये नियमित आरोग्य तपासणी, फिजिओथेरपी, मानसिक समुपदेशन, पौष्टिक आहार, औषधोपचार आणि मनोरंजनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अंथरुणाला खिळलेल्या वृद्धांसाठी स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला असून, प्रशिक्षित कर्मचारी दिवस-रात्र सेवा देत आहेत. कर्करोग आणि कोमामध्ये असलेल्या रुग्णांसाठी विशेष काळजी घेतली जात असल्याचे संस्थेने सांगितले. संस्थेच्या माहितीनुसार, वृद्धाश्रमात धर्म, जात, भाषा किंवा आर्थिक स्थिती न पाहता गरजू वृद्धांना प्रवेश दिला जातो. “प्रत्येक वृद्धाला कुटुंबासारखी वागणूक मिळाली पाहिजे,” या भावनेतून संपूर्ण प्रकल्प उभारण्यात आल्याचा दावा संस्थेने केला आहे.
या परिसरात मोठे सभागृह, वाचनालय, आध्यात्मिक कार्यक्रमांसाठी जागा तसेच विरंगुळ्यासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. वृद्धांचे मानसिक आरोग्य चांगले राहावे यासाठी विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमही आयोजित केले जातात. समाजातील नागरिकांनी निराधार, असहाय्य किंवा अंथरुणाला खिळलेले वृद्ध आढळल्यास त्यांना सद्भावना वृद्धाश्रमात आणण्यासाठी मदत करावी, असे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे. “कोणीही वृद्ध एकटा राहू नये,” हा संदेश देत हा प्रकल्प सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *