आगरी समाजाच्या विकासाला माझे सर्वप्रथम प्राधान्य : महेंद्रशेठ घरत
उलवा : कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या वातानुकूलित भव्य सभागृहाचे आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते शनिवारी शानदार उदघाटन करण्यात आले. या समारंभाला बदलापूरच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे, जिल्हा परिषद सदस्य बाबूशेठ घारे, उद्योजक मयूर पिसे आदी मान्यवर उपस्थित होते.
कर्जतच्या आगरी समाज सभागृहाचे संपूर्ण अत्याधुनिक नूतनीकरण यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी १२ लाख ५० हजार रुपये सढळ हस्ते केलेल्या देणगीतून करण्यात आले आहे. त्यामुळे कर्जत तालुका आगरी समाज संघटनेतर्फे महेंद्रशेठ घरत यांचा यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला. “महेंद्रशेठ घरत हे आगरी समाजातील आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगारांचे नेतृत्व करणारे अवलिया आणि दानशूर व्यक्तिमत्त्व आहेत, याचा कर्जतच्या आगरी समाजाला अभिमान आहे,” असे कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, “मला आगरी असल्याचा सार्थ अभिमान आहे. आपला समाज मेहनतीने आणि सन्मानाने जगण्याला अधिक प्राधान्य देतो. कुणापुढे कारण नसताना झुकत नाही. ताठ कण्याचा आपला समाज मला प्रिय आहे. त्यामुळे आगरी समाजाच्या उत्कर्षासाठी मी सर्व प्रकारचे सहकार्य करतो. समाजाच्या मागे मी कायमच खंबीरपणे उभा आहे आणि राहीन. कर्जतचा आगरी समाज संघटित होऊन समाजाच्या भल्यासाठी प्रयत्न करतोय. त्यामुळे कर्जतच्या आगरी समाजावर माझे विशेष प्रेम आहे. त्यांच्यासाठी माझा मदतीचा हात कायमच राहील. मी जागतिक पातळीवर कामगारांचे नेतृत्व करीत आहे. त्यामुळे जगभर फिरतो; परंतु मी माझ्या गावाच्या विकासाबाबत संवेदनशील आहे. आज राज्यात रोल मॉडेल ठरेल, असा माझ्या शेलघर गावाचा सुनियोजित विकास मी करून घेतला आहे. आज तिथे ग्रामस्थांना बोट ठेवायला जागा नाही. मी जिल्हा परिषद सदस्य असताना गावोगावी जलकुंभ बांधून महिलांच्या डोक्यावरील हंडा उतविला. लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यावर अभ्यास करून अधिकाऱ्यांवर वचक ठेवला आणि विकासात्मक कामे करून घेतली. रायगडमध्ये सी. डी. देशमुख यांच्यानंतर मी जगाच्या व्यासपीठावर नावलौकिक मिळवतोय. तिथेही मी त्या त्या देशांच्या कामगार नेत्यांवर वचक ठेवून आहे.”
या समारंभाला बदलापूरच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे, जिल्हा परिषद सदस्य बाबूशेठ घारे, उद्योजक मयूर पिसे, कर्जत पंचायत समिती सदस्य भगवान चंचे, नितीन धुळे, रेश्माताई जोशी, मंगेश म्हसकर, विपूल पाटील, तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. हा समारंभ हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील सामाजिक सभागृह नेरळ-बोपेले येथे पार पडला.
यावेळी कर्जत तालुका आगरी समाज संघटनेचे अध्यक्ष संतोष पेरणे, माजी अध्यक्ष नागो गवळी, एकनाथ धुळे, सावळाराम जाधव, कर्जत तालुका काँग्रेस अध्यक्ष संजय गवळी, उरण तालुका प्रमुख विनोद म्हात्रे, किरीट पाटील, वैभव पाटील, निखिल ढवळे आणि एम. जी. ग्रुपचे सदस्य उपस्थित होते. यावेळी जितेंद्र गवळी यांनी सूत्रसंचालन केले, तर भरत भगत यांनी प्रास्ताविक केले.
