– रिक्षाचालकाने मारला एसटी चालकाच्या डोक्यात हातोडा
राज भंडारी
पनवेल : शहरातील शिवशंभो नाका येथील सिग्नलजवळ एस टी बस आपल्या अंगावर येईल असा गैरसमज मानत बाळगून एसटी चालकाजवळ उद्धटपणे शिवीगाळ करीत एसटी बसमधून चालकाला खाली उतरण्यास भाग पाडून नंतर आपल्या रिक्षातील हातोड्याने एसटी बस चालकाच्या डोक्यात जबर प्रहार केल्याची घटना गुरुवारी भरदुपारी २ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास घडली. यावेळी इतर जागरूक नागरिकांनी रिक्षाचालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
याबाबत प्रथमदर्शी मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिवशंभो नाका (तक्का) येथील सिग्नल जवळ विलास म्हात्रे याने आपली रिक्षा (MH ४६ बीपी ४४८४) थांबविली. मात्र मागून येणाऱ्या विटा – मुंबई या बसने रिक्षाजवळ बस थांबाविल्यामुळे रिक्षा चालक विलास म्हात्रे याचा इगो दुखावला गेला. यावेळी माझ्या गाडीला ठोकला असतास म्हणून एसटी बस चालकाला अश्लील शिवीगाळ देण्यास सुरुवात केली. यावेळी बसचालक बासमधून खाली उतरताच विलास म्हात्रे या रिक्षाचालकाने आपल्या रिक्षामध्ये ठेवलेला हातोडा काढून बस चालकाच्या डोक्यात मारला. यावेळी बस चालक हा त्यांचक्षणी रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला.
यावेळी जमलेल्या सुज्ञ नागरिकांनी दुसऱ्या एका रिक्षातून त्या चालकाला बसमधील वाहकासोबत प्राथमिक उपचारासाठी पनवेलमधील गांधी रुग्णालयात पाठवले. तसेच पोलिसांना पाचारण केल्यानंतर नागरिकांनी विलास म्हात्रे या रिक्षा चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले. अद्यापही एसटी बस चालकाच्या प्रकृतीबाबत माहिती मिळाली नसली, तरी पोलीस ठाण्यात याबाबतचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *