डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात होणार मोठा कायापालट
कल्याण : डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या बहुप्रतिक्षित सॅटीस  प्रकल्पाच्या कामाला कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निर्देशानंतर मोठी गती मिळाली असून, एमएमआरडीए प्रशासन आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात संयुक्त सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. डोंबिवलीतील रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी, अपुरी पार्किंग आणि त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता हा प्रकल्प जलदगतीने  मार्गी लावण्याचे निर्देश खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एमआरडीएच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
डोंबिवली शहराची वाढती लोकसंख्या आणि रेल्वे स्थानक परिसरातील दिवसेंदिवस वाढणारी गर्दी पाहता पूर्व-पश्चिम जोडणी अधिक सक्षम करण्याची गरज निर्माण झाली होती. याच पार्श्वभूमीवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीए प्रशासन, महापालिका अधिकारी आणि संबंधित विभागांसोबत वेळोवेळी बैठका घेत सॅटीस प्रकल्पाबाबत सातत्याने पाठपुरावा केला. एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनाही प्रत्यक्ष सर्वेक्षण करून प्रकल्पाची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. त्यानुसार आता प्रत्यक्ष संयुक्त सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे.
या प्रकल्पाअंतर्गत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची इमारत, रामनगर पोलीस ठाणे, विष्णूनगर पोलीस ठाणे आणि परिसरातील उपलब्ध जागांचा एकत्रित वापर करून आधुनिक सॅटीस संकुल उभारण्यात येणार आहे. नियोजनबद्ध पद्धतीने जागांचा वापर करत रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक व्यवस्थेचा ताण कमी करण्यावर भर दिला जाणार आहे. सॅटीस प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात मोठा बदल पाहायला मिळणार आहे.
प्रवाशांसाठी मोठ्या प्रमाणात आधुनिक पार्किंग सुविधा, पादचारी मार्ग, वाहतुकीचे शास्त्रोक्त नियोजन तसेच विविध नागरी सुविधा उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे रेल्वे स्थानक परिसरातील दररोजची वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. डोंबिवलीच्या भविष्यातील वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असून यामुळे नागरिकांना आधुनिक आणि सुसज्ज पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहे.
डोंबिवली पूर्व-पश्चिम सॅटीस प्रकल्प मार्गी लावण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून एमएमआरडीए आयुक्तालयात सातत्याने बैठका घेत संबंधित अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली होती. डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, प्रवाशांना होणारा त्रास आणि भविष्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता हा प्रकल्प तातडीने मार्गी लावणे आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी वारंवार मांडली होती.
एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सातत्याने पाठपुरावा करत प्रत्यक्ष संयुक्त सर्वेक्षण सुरू करण्याच्या सूचना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार आता एमएमआरडीए आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून संयुक्त सर्वेक्षण प्रक्रिया सुरू झाली आहे. डोंबिवलीच्या वाहतूक व्यवस्थेला, आणि पार्किंग व्यवस्थेला भविष्यात मोठा दिलासा देणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरात लवकर प्रत्यक्षात यावा यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे प्रयत्न सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *