मुंबई महापौर चषक खो-खो स्पर्धा
मुंबई : मुंबई महापौर चषक खो-खो स्पर्धेचे आयोजन मुंबई खो-खो संघटनेने छत्रपती शिवाजी उद्यान, दादर (प.), मुंबई येथे २७ ते ३० मे कालावधीत आयोजन केले आहे. आज खेळवण्यात आलेल्या पुरुष आणि महिला गटातील सामन्यांनी प्रेक्षकांना रोमांचित केले. पुरुष गटात सरस्वती स्पोर्ट्स क्लब, प्रबोधन क्रीडा भवन, वैभव स्पोर्ट्स क्लब, श्री सह्याद्री, श्री समर्थ व्यायाम मंदिर, ॐ समर्थ भारत व्यायाम मंदिर आणि विद्यार्थी क्रीडा केंद्र यांनी विजय मिळवत आपला दबदबा कायम ठेवला. तर महिला गटात ॐ साईश्वर सेवा मंडळ आणि अमरहिंद मंडळ यांनी प्रभावी विजय नोंदवले. स्पर्धेचे उद्घाटन नगरसेवक व प्रभाग समिती अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ॲड. अरुण देशमुख, बाळासाहेब तोरसकर, सुरेंद्र विश्वकर्मा, प्रशांत पाटणकर, नरेंद्र कुंदर, पराग आंबेकर, नितीन पाष्टे, यांची उपस्थिती होती.
पुरुषांच्या सामन्यात सरस्वती स्पोर्ट्स क्लबने समता क्रीडा भवनचा १६-८ (मध्यंतर १६-४) असा १ डाव व ८ गुणांनी धुव्वा उडवला. सरस्वतीकडून कुशांग वैश्य (३ मि. संरक्षण व ३ गुण), शुभम कांबळे (२.५० मि. संरक्षण व १ गुण), रहीस शेख (२.३० मि. संरक्षण व २ गुण) आणि विनय परीट (१.४० मि. संरक्षण व २ गुण) यांनी शानदार खेळ करत संघाचा विजय निश्चित केला. पराभूत समता संघाकडून प्रणय भाये (१.५० मि. संरक्षण), अनिकेत लोंढे (१ मि. संरक्षण व २ गुण) आणि प्रथमेश चौगुले (१.३० मि. संरक्षण व १ गुण) यांनी पराभवातही झुंजार खेळ केला.
दुसऱ्या पुरुष सामन्यात प्रबोधन क्रीडा भवन संघाने अमरहिंद मंडळाचा १९-१६ (मध्यंतर १०-७) असा ३ मि. राखून ३ गुणांनी पराभव केला. प्रबोधनकडून सुमेध तांडेल (२.५० मि. संरक्षण व ४ गुण), मानव साळवी (२ मि. संरक्षण व १ गुण), हरेश मोरे (१.२०, १.३० मि. संरक्षण व २ गुण) आणि शुभम शिंदे (३ गुण) यांनी संघाला विजय मिळवून दिला. तर अमरहिंदकडून गणेश साहू (२.१०, १ मि. संरक्षण व ३ गुण), प्रणय प्रधान (१.३० मि. संरक्षण व १ गुण) आणि सिद्धेश चोरगे (५ गुण) यांनी जोरदार लढत दिली, मात्र ती अपुरी ठरली.
महिलांच्या सामन्यात ॐ साईश्वर सेवा मंडळने समता क्रीडा भवनचा १०-४ (मध्यंतर १०-०) असा १ डाव व ६ गुणांनी दणदणीत पराभव केला. विजयी संघाकडून वैष्णवी परबने नाबाद ९ मिनिटांचे संरक्षण करत ४ गुण मिळवले. तसेच प्रांजल पाठक (३ मि. संरक्षण), रिया कदम (२.४० मि. संरक्षण व १ गुण) आणि विद्या मटकर (३ गुण) यांनी विजयात मोलाचे योगदान दिले. पराभूत समता संघाकडून सृष्टी कारेवडे (३ मि. संरक्षण), हर्षदा गुरव (१.१० मि. संरक्षण) आणि प्राप्ती (१ मि. संरक्षण) यांनी संघर्षपूर्ण खेळ केला.
महिलांच्या दुसऱ्या सामन्यात अमरहिंद मंडळने गोयंका स्पोर्ट्स क्लबचा १४-७ (मध्यंतर ५-३) असा ७ गुणांनी दणदणीत पराभव केला. अमरहिंदकडून रुद्रा नाटेकर (४.३०, २.२० मि. संरक्षण व १ गुण), संजना कुडव (३ मि. संरक्षण व २ गुण), नताशा नतापे (१.२०, २.५० मि. संरक्षण व ४ गुण) आणि देविशा म्हात्रे (२ मि. संरक्षण व ५ गुण) यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. गोयंका स्पोर्ट्सकडून ज्ञानदा सावंत (२.३०, नाबाद १.३० मि. संरक्षण व २ गुण), वैदेही मोहिते (३, १ मि. संरक्षण व ४ गुण) आणि अर्शीन शेख (२.३० मि. संरक्षण) यांनी पराभवातही उल्लेखनीय खेळ केला.
पुरुष गटातील इतर सामन्यांचे निकाल
वैभव स्पोर्ट्स क्लबने ओम युवा स्पोर्ट्स क्लबचा १५-१३ (मध्यंतर ९-६) असा १ डाव व २ गुणांनी पराभव केला.
श्री सह्याद्री संघाने ॐ साईश्वर सेवा मंडळाचा २०-११ (मध्यंतर २०-५) असा १ डाव व ९ गुणांनी धुव्वा उडवला.
श्री समर्थ व्यायाम मंदिराने अमर कौर स्पोर्ट्स क्लबवर १३-७ (मध्यंतर १३-४) असा १ डाव व ७ गुणांनी धमाकेदार विजय मिळवला.
ॐ समर्थ भारत व्यायाम मंदिराने यु बी स्पोर्ट्स क्लबचा १६-११ (मध्यंतर १६-४) असा १ डाव व ५ गुणांनी दणक्यात पराभव केला.
तर विद्यार्थी क्रीडा केंद्राने नंदादीप स्पोर्ट्स क्लबवर १४-९ (मध्यंतर १४-५) असा १ डाव व ५ गुणांनी मोठा विजय नोंदवला.
0000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *