नवी मुंबई महापालिका व क्रेडाई-बीएएनएमतर्फे विशेष जागरूकता शिबिर
नवी मुंबई : विकासकामांसोबत पर्यावरण संवर्धन आणि कामगार सुरक्षा यांनाही समान महत्त्व दिले पाहिजे. मजबूत बांधकाम, ग्रीन बिल्डिंग, जलसुरक्षा आणि ऊर्जा बचत यांच्याबरोबरच बांधकाम क्षेत्रातील कामगारांची सुरक्षा हा अत्यंत महत्त्वाचा घटक असल्याचे प्रतिपादन नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले. बांधकाम साईटवर काम करणाऱ्या कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या आरोग्य व सुरक्षेची विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
नवी मुंबई महानगरपालिका आणि क्रेडाई-बीएएनएम यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्र येथे बांधकाम स्थळांवरील कामगार सुरक्षा विषयक विशेष जागरूकता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे, अशा प्रकारचे सर्वसमावेशक कामगार सुरक्षा शिबिर आयोजित करणारी नवी मुंबई महानगरपालिका ही राज्यातील पहिली महानगरपालिका ठरली आहे.
या कार्यक्रमास कामगार उपआयुक्त संभाजी व्हनाळकर, शहर अभियंता शिरीष आरदवाड, सहायक संचालक नगररचना सोमनाथ केकाण, सहायक पोलीस निरीक्षक संदीप माने, नगररचनाकार युवराज चव्हाण, सहायक कामगार आयुक्त सारिका राऊत तसेच क्रेडाई-बीएएनएमचे अध्यक्ष रसिक चौहान, सचिव जिगर त्रिवेदी, सहसचिव प्रतिक भद्रा आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
कामगार उपआयुक्त संभाजी व्हनाळकर यांनी शासनाच्या बांधकाम कामगारांसाठीच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली. मोफत आरोग्य तपासणी, गृहउपयोगी वस्तू संच, सुरक्षा साहित्य वितरण यांसारख्या योजनांचा लाभ घेण्यासाठी कामगारांची www.mahabocw.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. १८ ते ६० वर्षे वयोगटातील पात्र कामगार आणि त्यांच्या शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी अनेक लाभदायी योजना उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सहायक संचालक नगररचना सोमनाथ केकाण यांनी कामगार सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बांधकाम साईटवरील कामगारांना आवश्यक सुविधा आणि संरक्षण साधने उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
सहायक पोलीस निरीक्षक संदीप माने यांनी बांधकाम स्थळांवर अपघात टाळण्यासाठी घ्यावयाच्या खबरदारीच्या उपाययोजना तसेच दुर्घटना घडल्यास करावयाच्या कायदेशीर कार्यवाहीबाबत मार्गदर्शन केले. ब्रिटिश सेफ्टी कौन्सिलचे व्याख्याते रसिल कुमार यांनी कामगार सुरक्षा कायदे, तर युनिकोचे उत्कर्ष शुक्ला यांनी बांधकाम साईटवरील अपघातांची कारणे आणि प्रतिबंधात्मक उपाय यावर सविस्तर माहिती दिली.
कामगार सुरक्षा, पावसाळी उपाययोजना, सार्वजनिक सुरक्षा, अपघात प्रतिबंध आणि आपत्कालीन व्यवस्थापन यांसारख्या विषयांवर आयोजित या शिबिरात अधिकारी, बांधकाम व्यावसायिक, वास्तुविशारद, साईट इन्चार्ज, सुरक्षा अधिकारी आणि बांधकाम पर्यवेक्षक यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. क्रेडाई-बीएएनएमतर्फे जुबेन सगवई यांनी आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *