मुंबई महापौर चषक खो-खो स्पर्धा – २०२६
मुंबई : मुंबई खो-खो संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी उद्यान, दादर (प.), मुंबई येथे सुरू असलेल्या मुंबई महापौर चषक खो-खो स्पर्धा – २०२६ मध्ये पुरुष, महिला आणि व्यावसायिक गटातील उपांत्य फेरीचे सामने झाले. शिवाजी पार्क परिसरातील क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत खेळाडूंना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अंतिम फेरीत पुरुषांमध्ये शिर्सेकर्स महात्मा गांधी वि. श्री समर्थ व्यायाम मंदिर, महिलांमध्ये सरस्वती कन्या संघ वि. शिर्सेकर्स महात्मा गांधी तर व्यावासायील पुरुष गटात सेंट्रल रेल्वे वि. मुंबई पोलीस असे सामने रंगणार आहेत.
पुरुष गटाच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात शिर्सेकर्स महात्मा गांधीने विद्यार्थी क्रीडा केंद्राचा १३-१० (मध्यंतर १३-५) असा एक डाव व ३ गुणांनी मोठा पराभव केला. या सामन्यात शिर्सेकर्स महात्माच्या रामचंद्र झोरे (२.१०, २.२० मि. संरक्षण), सुजल जयगाडे (३ मि. संरक्षण व १ गुण), धीरज भावे (२, १.२० मि. संरक्षण), अनिकेत पोटे (नाबाद १.४० संरक्षण व २ गुण), निहार दुबळे (४ गुण) अर्जुन आणि वसे अनीवसे (३ गुण) यांनी संघाला विजयाला गवसणी घातली तर पराभूत विद्यार्थीच्या शुभम शिंदे (२.२० मि. संरक्षण ), प्रतीक घाणेकर (१, १.१० मि. संरक्षण २ गुण ) व पवन नाचणकर १.२० संरक्षण) यांनी केलेली कामगिरी विजयासाठी खूपच अपुरी ठरली.
पुरुष गटाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात श्री समर्थ व्यायाम मंदिर ने सरस्वती स्पोर्ट्स क्लब चा (१९-१०) ( मध्यंतर ९-६ गुण) असा ९ गुणांनी पराभव केला. या सामन्यात श्री समर्थच्या अक्षय खापरे (२.१० मि. संरक्षण व ७ गुण), हितेश आंग्रे (१.४०, २.४० मि. संरक्षण व ३ गुण), सुरज खाके (१.१०, नाबाद १ मि. संरक्षण व २ गुण) यश बोरकर (१.४०मि. संरक्षण व १ गुण) व वेदांत देसाई (१.५० मि. संरक्षण व २ गुण) यांनी विजय निश्चित केला. तर पराभूत सरस्वती स्पोर्ट्स क्लबच्या रोहन टेमकर (२.२०, १.३०मि. संरक्षण), करण गारोळे (१.४०, २.१०मि. संरक्षण व १ गुण) व चैतन्य धुळप (२. मि. संरक्षण व २ गुण) विनय परीट (१.२०, १.२० मि. संरक्षण) यांनी दिलेली कडवी लढत अपयशी ठरली.
महिला गटाच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सरस्वती कन्या संघाने अ. भी. गोरेगावकरचा ११-८ (मध्यंतर ५-२) असा ३ गुणांनी चुरशीच्या सामन्यात पराभव केला. या सामन्यात सरस्वतीच्या सेजल यादव (४, २.२० मि. संरक्षण व ३ गुण), जानवी लोंढे (नाबाद २.१०, ४.५० मि. संरक्षण व ४ गुण), खुशबू सुतार (२.५०, १.४० मि. संरक्षण ३ गुण) यांनी संघाला दणक्यात अंतिम फेरीत स्थान मिळवून दिले. तर पराभूत अ. भी. गोरेगावकरच्या कृतिका वाघमारे (२.४०, १.३० मि. संरक्षण व २ गुण), रिया बद्रिके (२.२०मि. संरक्षण) व सलोनी पवार (३ मि. संरक्षण ) सिया बद्रिके (१, १.२० मि. संरक्षण) यांनी दिलेली कडवी लढत अपयशी ठरली
महिला गटाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमीने श्री सह्याद्री संघाचा १३-९ (मध्यंतर १३-४) असा एक डाव ४ गुणांनी धुव्वा उडवला. या सामन्यात शिर्सेकर महात्मा गांधीच्याच्या पाष्टे सृष्टी (३.२० मि. संरक्षण), नेहा हळदणकर (नाबाद २.२० मि. संरक्षण ), गायकवाड दिव्या (१.२०, १.५० मि. संरक्षण व १ गुण) व मिताली बारसकर (४ गुण) यांच्या कामगिरीच्या जोरावर संघाने अंतिम फेरीत धडक दिली. तर पराभूत श्री सह्याद्रीच्या आर्या भाटकर (१ मि. संरक्षण व ४ गुण), तन्वी थेराडे (२.२० मि. संरक्षण ३ गुण) लावण्या नाकती (१.२०) यांनी दिलेली लढत अपयशी ठरली.
व्यावसायिक गटाच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सेंट्रल रेल्वेने स्पेशल प्रोटेक्शन युनिटचा १९-२ (मध्यंतर १९-२) असा एक डाव व १७ गुणांनी पराभव केला. या सामन्यात सेंट्रल रेल्वे च्या दिलीप खांडवी (४ मि. संरक्षण ), शुभम थोरात (३.१०मि. संरक्षण), आकाश तोगरे (५ गुण) व रामजी कश्यप व सौरभ घाडगे (प्रत्येकी ३ गुण) यांनी संघाला विजयाचीची दारे उघडून दिली तर पराभूत स्पेशल प्रोटेक्शन युनिट च्या श्रीधर देसाई (१.४०, १ मि. संरक्षण), चेतन बावणे (१, १ मि. संरक्षण) यांनी दिलेली लढत अपयशी ठरली.
व्यवसायिक गटाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबई पोलीस या संघाने महावितरण कंपनीचा १३-४ (मध्यंतर १३-४) असा एक डाव व ९ गुणांनी धुव्वा उडवला. या सामन्यात मुंबई पोलीस च्या वेदांत देसाई (२.३० मि. संरक्षण व १गुण), प्रदीप जाधव (२.२० मि. संरक्षण), अक्षय खापरे (२.१०मि. संरक्षण व २ गुण) व सोहेल कलावंत (५ गुण) सुजित पावल (१.५० मि. संरक्षण) यांनी संघाला विजय मिळवून दिले. तर पराभूत महावितरण कंपनीच्या प्रतीक वाईकर (१.४० मि. संरक्षण व २ गुण), संभाजी जाधव (१.५० मि. संरक्षण) व विराज कोटमकर (१ मि. संरक्षण) यांनी दिलेली लढत अपयशी ठरली.
०००००००००
००००००००
