सारेगमप लिटल चॅम्प फेम अंजली गायकवाड व ज्ञानेश्वरी गाडगे यांचे सुमधुर गायन
पनवेल : माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त “लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सव वर्ष नियोजन समिती”, “श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ” आणि “नादब्रह्म साधना मंडळ, खारघर” यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, १ जून रोजी सायंकाळी ५ वाजता पनवेल येथे ‘स्वर संध्या’ या भव्य सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात होणारा हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य खुला ठेवण्यात आला आहे.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक योगदानाचा गौरव करण्यासाठी अमृत महोत्सव वर्ष विविध उपक्रमांनी साजरे करण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून या विशेष संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. संगीतप्रेमींसाठी दर्जेदार आणि सुरेल संगीताची मेजवानी ठरणाऱ्या या कार्यक्रमात ‘सारेगमप लिटल चॅम्प’ फेम अंजली गायकवाड आणि ज्ञानेश्वरी गाडगे आपल्या सुमधुर गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत.
अल्पावधीतच आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायकीने रसिकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या या दोन्ही कलाकारांच्या सादरीकरणाबाबत संगीतप्रेमींमध्ये विशेष उत्सुकता आहे. कार्यक्रमाला पंडित प्रताप बुवा पाटील यांची मृदुंग साथ, प्रसाद पाध्ये यांची तबला साथ आणि सूर्यकांत सुर्वे यांचे तालवाद्य लाभणार असून अनुभवी कलाकारांच्या साथ संगतीमुळे कार्यक्रमाची रंगत अधिक वाढणार आहे.
याशिवाय नवदुर्गा प्रासादिक भजन मंडळ, कोपरा यांच्यावतीने सुरेल भजनांचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. यामध्ये गायिका शिवमाला पाटील, पखवाज वादक निलेश पाटील तसेच तबलावादक मृगेंद्र कडू सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर मडके करणार आहेत. संगीत, भजन आणि सांस्कृतिक परंपरेचा सुंदर संगम असलेल्या या अविस्मरणीय मैफलीचा लाभ रसिकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन आयोजक संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
