०००००००
ठाणे : देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सेवा, सुशासन आणि विकासाला समर्पित १२ वर्षांचा यशस्वी कार्यकाळ पूर्ण झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी, कोपरी मंडलच्या वतीने विद्यासागर विद्यालय, ठाणे येथे विकास प्रदर्शनी, चित्रकला स्पर्धा आणि गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला आमदार निरंजन डावखरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच सीएसएल ठाणे शहरचे विनोद टीकमानी यांची विशेष उपस्थिती होती.
यासाठी कृष्णाया भुजबळ, रोहित कवे, सचिन कुटे, अमोल गायके, गणेश लोकरे, अवधूत कदम, पूजाताई गंद्रे, स्वाती राणे, अर्चना बाळसराफ, आद्याक्षरा म्हात्रे, प्रणाली गांगुर्डे विशेष परिश्रम घेतले.विकास प्रदर्शनीच्या माध्यमातून केंद्र सरकारने गेल्या बारा वर्षांत पायाभूत सुविधा, डिजिटल इंडिया, गरीब कल्याण, महिला सक्षमीकरण, आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारताच्या दिशेने केलेल्या विविध विकासकामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली. प्रदर्शनीला नागरिक, विद्यार्थी आणि पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत बोलताना भाजप कोपरी मंडल अध्यक्ष कृष्णा भुजबळ यांनी सांगितले की, मोदी सरकारच्या विकासात्मक कार्याची माहिती समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचविण्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्याचा या उपक्रमामागील उद्देश आहे.
००००००
