मुंबई : ज्येष्ठ संपादक संजीव साबडे यांच्या ‘खाऊ गल्ली’ पुस्तकाचे लज्जतदार प्रकाशन बुधवार, २४ जून रोजी सायंकाळी ६ वाजता प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमीत (रवींद्र नाट्य मंदिर) होणार आहे. स्वामीराज प्रकाशन यांनी या पुस्तकाची निर्मिती केली आहे. या सोहळ्याला भारतीय खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक, पत्रकार आणि फेसबुकवरील ‘मुंबई स्वयंपाकघर’ ग्रुपच्या प्रमुख भक्ती चपळगावकर, खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक आणि लेखिका आरजे रश्मी वारंग आणि देशी-विदेशी खाद्यजीवनाची विविध प्रकारे ओळख करून देणारे सेलिब्रेटी खाद्यप्रेमी आणि ‘खाने में क्या है‘ फेम कुणाल विजयकर खास उपस्थित राहणार आहेत. सूत्रसंचालन कल्पना राणे करणार आहेत.
तब्बल चार दशके पत्रकारिता करताना संजीव साबडे यांनी मुंबई ठाण्यासह इतर शहरातील खाद्यसंस्कृतीचा धांडोळा घेतला. तोच या खाऊगल्लीत वाचकांना तृप्त करणार आहे. या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विख्यात चित्रकार विनय गावडे यांनी रेखाटलेली चित्रे. महान चित्रकार मारिओ मिरांडा यांच्या चित्रशैलीला समर्पित केलेली ही रचना आहे. तरी समस्त खाद्य आणि साहित्यप्रेमींनी या लज्जतदार प्रकाशन सोहळ्याला आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन प्रकाशक ज्येष्ठ संपादक रजनीश राणे यांनी केले आहे.
