मुंबई: फिटनेस फ्रायडे क्लबतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला सूर्यनमस्कार चॅलेंज आणि आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात पार पडला. या उपक्रमाला देशभरातून तसेच परदेशातूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, हे विशेष. सूर्यनमस्कार चॅलेंजमध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करण्यात आली होती. सहभागींनी सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक करून त्यांचे फोटो व व्हिडिओ विशेष योग दिन ग्रुपमध्ये अपलोड केले. देशाच्या विविध भागांतून तसेच परदेशातूनही मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवून योग व फिटनेसप्रती असलेली आपली बांधिलकी दर्शविली. चॅलेंजमधील सहभागींचा गौरव करण्यासाठी योग दिन कार्यक्रमात त्यांना पदके प्रदान करण्यात आली.
अंधेरीच्या शहीद हेमंत करकरे उद्यान येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पहाटेपासूनच ३०० हून अधिक योगप्रेमींनी उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्साहपूर्ण प्रतिसाद दिला. कार्यक्रमाची सुरुवात फिटनेस प्रशिक्षक संतोष पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वॉर्म-अप सत्राने झाली. त्यानंतर डॉ. अवनी कनाकिया यांनी योगसत्राचे नेतृत्व केले. त्यांना योग प्रशिक्षक अनिता आणि राजेश यांचे सहकार्य लाभले. प्रशिक्षकांनी विविध योगासनांचे प्रात्यक्षिक सादर करत सहभागींचे मार्गदर्शन केले. या प्रसंगी डॉ. अवनी कनाकिया लिखित “द डिजिटल पाथ टू इनर पिस: इंटिग्रेटिंग योगा अँड टेक्नॉलॉजी इन मॉडर्न एज्युकेशन” या पुस्तकाचे The Digital Path to Inner Peace – Integrating Yoga and Technology in Modern Education” या पुस्तकाचे प्रकाशन डॅनियल वाझ यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांचाही उल्लेखनीय सहभाग होता. आर.सी.मारुती हायस्कूल, अंधेरी आणि फार्मा अकॅडमी, गोरेगाव या शाळांनी सहभाग नोंदविला. आर.सी. मारुती हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्काराचे उत्कृष्ट प्रात्यक्षिक सादर केले तसेच आकर्षक योग पिरॅमिड शो सादर करून उपस्थितांची दाद मिळविली. फिटनेस फ्रायडे क्लबच्या कोअर कमिटी सदस्यांचे नियोजन, समन्वय आणि अथक परिश्रमामुळे कार्यक्रम यशस्वी होण्यास मोलाची मदत झाली.
