– अमेरिका आणि लंडनच्या दोन प्रतिष्ठित संस्थांकडून दुहेरी आंतरराष्ट्रीय पुरस्कार
कल्याण : शिक्षण, संशोधन आणि नवोपक्रमाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एस.एस.टी. कला व वाणिज्य महाविद्यालयाने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या गुणवत्तेची छाप उमटविली आहे. महाविद्यालयाला अमेरिकेतील युडोक्सिया रिसर्च युनिव्हर्सिटीकडून ‘उच्च शिक्षणातील दूरदर्शी नेतृत्वासाठी पुरस्कार’ तसेच लंडनस्थित युनिव्हर्सल वर्ल्ड रिसर्च इनोव्हेशन सेंटरकडून ‘संशोधन आणि नवोपक्रमातील उत्कृष्टतेसाठी संस्था पुरस्कार’ या दोन प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
ऑनलाइन आयोजित करण्यात आलेल्या या पुरस्कार सोहळ्यात जगभरातील विविध शैक्षणिक संस्थांचा सहभाग होता. शिक्षणातील दूरदर्शी नेतृत्व, संशोधनाला चालना, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, कौशल्याधारित शिक्षण, सामाजिक उत्तरदायित्व आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत एसएसटी महाविद्यालयाची या सन्मानासाठी निवड करण्यात आली.
महाविद्यालयाने गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदांचे यशस्वी आयोजन, विद्यार्थी व शिक्षकांच्या संशोधन प्रकाशनांना प्रोत्साहन, उद्योगाभिमुख आणि मूल्यवर्धित अभ्यासक्रम, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डिजिटल कौशल्ये आणि उद्योजकता विकासावर आधारित उपक्रम यांद्वारे उच्च शिक्षण क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
याशिवाय, राष्ट्रीय सेवा योजना, डीएलएलइ, पर्यावरण संवर्धन, सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडा क्षेत्रातही महाविद्यालयाने उल्लेखनीय यश मिळविले आहे. महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी विद्यापीठ, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये यश संपादन करून संस्थेचा गौरव वाढवत आहेत.
पुरस्कार स्वीकारताना महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी हा सन्मान संस्थेचे संस्थापक, व्यवस्थापन, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि माजी विद्यार्थी यांच्या सामूहिक परिश्रमांचे फलित असल्याचे सांगितले. हा गौरव भविष्यात अधिक दर्जेदार शिक्षण, संशोधन आणि नवोपक्रमासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या दुहेरी आंतरराष्ट्रीय यशाबद्दल शैक्षणिक, सामाजिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून एसएसटी महाविद्यालयावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. जागतिक स्तरावर मान्यता मिळवत एसएसटी महाविद्यालयाने उल्हासनगरच्या शैक्षणिक विश्वात आणखी एक मानाचा अध्याय जोडला आहे.
0000000
