राष्ट्रीय आइस फिगर स्केटिंग स्पर्धा
मुंबई : २५ ते ३० जून या कालावधीत देहरादून येथे आयोजित करण्यात आलेल्या २१व्या राष्ट्रीय आइस फिगर स्केटिंग अजिंक्यपद स्पर्धेत प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल (पीटीकेएस) ने ऐतिहासिक यश संपादन केले आहे. प्रथमच पीटीकेएसच्या खेळाडूने राष्ट्रीय आइस फिगर स्केटिंग स्पर्धेत सहभाग नोंदवत उल्लेखनीय कामगिरी केली.
पीटीकेएसची खेळाडू रिदम हर्षन मामानिया हिने उत्कृष्ट कौशल्य, जिद्द आणि सातत्यपूर्ण सरावाच्या बळावर रौप्यपदक पटकावत संस्थेसह महाराष्ट्राचा गौरव वाढवला. राष्ट्रीय स्तरावरील या यशामुळे पीटीकेएसच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून क्रीडाक्षेत्रात या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रिदमच्या या ऐतिहासिक यशामागे सरावासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, सातत्याने मार्गदर्शन करणे आणि खेळाडूंना प्रोत्साहन देणे या माध्यमातून संकुलाचे अध्यक्ष अरविंद प्रभू सर यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे पीटीकेएसला राष्ट्रीय स्तरावर हे उल्लेखनीय यश मिळवता आले.
