आमदार संजय केळकर यांची संतप्त प्रतिक्रिया
अनिल ठाणेकर
ठाणे : ठाण्यातील अनधिकृत बांधकामांविरुद्ध आमदार संजय केळकर यांनी नागपूर अधिवेशनात आवाज उठवताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर कारवाईचे निर्देश दिले होते. मात्र तत्कालीन आयुक्तांनी कारवाईचा केलेला फार्स, नवीन आयुक्तांची नियुक्ती झाल्यानंतरही ठाण्यात आजही अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचा संताप आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला आहे.
ठाण्यातील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा आमदार संजय केळकर यांनी नागपूर अधिवेशनात गाजवला. त्यावेळी आ. संजय केळकर यांनी, ठाणे महापालिकेचे अधिकारी आयुक्तांच्या आदेशाची कशी पायमल्ली करतात याकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे निर्देश दिल्याने तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर मोहीम हाती घेतली पण या बांधकामांना जबाबदार असलेल्या एकाही अधिकाऱ्याला निलंबित केलेले नाही. केवळ एका सहायक आयुक्ताला सक्तीच्या रजेवर पाठवून कारवाईचा फार्स केला. याबद्दलची खंत आ. संजय केळकर यांनी नवे आयुक्त सौरभ राव यांच्याकडे व्यक्त केली आहे. काही ठिकाणच्या बांधकामांचे तपशील तक्रारदारांनी सादर केले. पण कारवाई शून्य ! ७२ माणसं या शहरात एका इमारत दुर्घटनेत मृत्युमुखी पडली, तरी सुद्धा प्रशासनाला अजून जाग आलेली नाही. ठाणे पश्चिमेकडील उथळसर प्रभाग समिती क्षेत्रातील पहिली राबोडी येथे शेरू कुरेशी या हॉटेल मालकाने आपल्या सागर हॉटेलच्या इमारतीवर बेधडकपणे बेकायदा मजले उभारण्यास सुरुवात केली आहे. या विरोधात राबोडीतील एका तक्रारदाराने दाखल केलेल्या रिट पीटीशनवर उच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेला आदेश देऊन सुरू असलेले अनधिकृत बांधकाम रोखण्याचे बजावले. न्यायालयाने स्पष्ट निर्देश देऊनही उथळसर प्रभागाचे अधिकारी ढिम्म असल्याचे जावेद शेख यांनी निदर्शनास आणले आहे. ही बाबही आमदार संजय केळकर यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. अशीच परिस्थिती बाळकुम, ढोकाळी, कळवा, मुंब्रा, वागळे इस्टेट, कोपरी आदी भागात असून येथे कारवाईचा केवळ फार्स न करता प्रत्यक्ष ठोस कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत. सध्या आचारसंहिता सुरू असून आयुक्तांनी ही बांधकामे तोडण्याची मोहीम हाती घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत, मात्र तरीही या प्रभागांत अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे आमदार संजय केळकर यांनी आयुक्त श्री. सौरभ राव यांच्या निदर्शनास आणून कठोर कारवाईची मागणी केली आहे.