खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची ग्वाही
कल्याण :  शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि काश्मीरमध्ये मैत्रीचा नवा अध्याय सुरु झाला आहे. काश्मीरमधील लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांना सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी शिवसेना कटिबद्ध असल्याची ग्वाही शिवसेना संसदीय पक्षाचे नेते संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. लडाखमधील द्रास जिल्हा रुग्णालयाला शिवसेनेने उपलब्ध केलेली सीटी स्कॅन मशीन व रुग्णवाहिका खासदार डॉ. शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुपूर्द करण्यात आली. यावेळी आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी महाराष्ट्राचे राज्यमंत्री योगेश कदम, शिवसेना राज्य संघटक आनंद परांजपे, बाजीराव चव्हाण, नितीन राठोड, सरहद संस्थेचे प्रमुख संजय नाहर, लडाखचे खासदार हाजी मोहम्मद हनीफा, डॉ. मोहम्मद जाफर, अब्दुल वाहिद तसेच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक व भारतीय लष्कराचे अधिकारी उपस्थित होते.
खासदार डॉ. शिंदे म्हणाले की मागील काही वर्षांत शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि कश्मीरमधील मैत्री वृद्धींगत झाली आहे. त्यांच्या नेतृत्वात कुपवाडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. कारगील युद्ध स्मारकासाठी ३ कोटींचा निधी देण्यात आला. आता वर्षभरात द्रासमधील जिल्हा रुग्णालयासाठी शिवसेनेकडून रुग्णवाहिका आणि सीटी स्कॅन मशीन देण्यात आली. शिवसेना हा शब्द पाळणारा पक्ष आहे, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले.
खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, देशात कुठेही नैसर्गिक संकट आले तर शिंदे साहेब स्वत: तिथे पोहोचतात. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर शिंदे साहेब स्वत: काश्मीरला आले. इथे अडकून पडलेल्या शेकडो महाराष्ट्रीय पर्यटकांना विमानाने पुन्हा राज्यात सुरक्षितपणे नेण्याचे काम त्यांनी केले होते. याच हल्ल्यात पर्यटकांना वाचवताना शहिद झालेल्या सय्यद आदिल हुसेन शाह याच्या कुटुंबियांना शिवसेनेने घर बांधून दिले. शिवसेना केवळ मतांसाठी नाही तर माणसुकीच्या नात्याने काम करते, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. काश्मीरमधील लोकांना जे जे आवश्यक असेल त्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे, असे ते म्हणाले.
सीमेवर काम करणाऱ्या भारतीय जवानांचे देशाप्रती असलेले समर्पण वाखणण्याजोगे आहे, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. कर्तव्यावर असताना सहा सहा महिने जवान कुटुबियांना भेटत नाही, देशासाठी जवानांचे सर्वोच्च समर्पण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि लष्कराच्या हातात देश सुरक्षित आहे, असे ते म्हणाले. सरहद संस्थेने कश्मीरमध्ये राबवलेल्या विविध उपक्रमांचे खासदार डॉ. शिंदे यांनी कौतुक केले.
लडाखमधील द्रास येथे सरहद फाउंडेशन आणि भारतीय लष्कराने आयोजित केलेल्या सरहद शौर्यथॉनचा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. सरहद शौर्यथॉनमध्ये जवळपास तीन हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर खासदार खासदार डॉ. शिंदे यांनी कारगीलमधील युद्ध स्मारक येथे वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *