रोहतक- हरियाणातील रोहतक येथे १० ते १२ जुलै दरम्यान सुरू असलेल्या सीनियर नॅशनल रेसलिंग चॅम्पियनशिप २०२६ मध्ये मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सौजन्याने व मीरा-भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील पैलवान विशाल जाधव याने ९२ किलो वजनी गटात तृतीय क्रमांक पटकावत मीरा-भाईंदरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. स्पर्धेच्या पहिल्या फेरीत विशालची लढत हिमाचल प्रदेशच्या अर्पित याच्याशी झाली. या सामन्यात सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत विशालने १२-२ अशा दणदणीत गुणफरकाने विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला.
दुसऱ्या फेरीत त्याच्यासमोर उत्तर प्रदेशचा तगडा पैलवान आकाश भाटी याचे आव्हान होते. या चुरशीच्या सामन्यात विशालला पराभव स्वीकारावा लागला. मात्र, आकाश भाटी अंतिम फेरीत पोहोचल्याने विशालला रिपेचेज फेरीद्वारे कांस्यपदकासाठी पुन्हा संधी मिळाली.
या संधीचे सोने करत रिपेचेजच्या पहिल्या सामन्यात कर्नाटकच्या नागार्जुन याच्या गैरहजेरीमुळे विशालला विजयी घोषित करण्यात आले. त्यानंतर कांस्यपदकाच्या निर्णायक सामन्यात पंजाबच्या कर्णवीर याच्यावर १०-० अशा तांत्रिक गुणफरकाने दणदणीत विजय मिळवत विशालने राष्ट्रीय स्पर्धेतील कांस्यपदकावर आपले नाव कोरले.
अभिनव कॉलेज, भाईंदर येथे तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या विशालसाठी हे पहिलेच राष्ट्रीय स्तरावरील पदक ठरले असून, त्याच्या या उल्लेखनीय यशामुळे सर्वत्र त्याचे अभिनंदन होत आहे. सध्या विशाल जाणता राजा कुस्ती केंद्र, पुणे येथे नियमित सराव करत असून, त्याच्या या यशामागे कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण सराव आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे.
श्री गणेश आखाड्यातील सर्व पदाधिकारी, वस्ताद, प्रशिक्षक, सहकारी पैलवान तसेच क्रीडाप्रेमींकडून विशाल जाधववर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरही तो देशाचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
