लोककला रसिकांसाठी पर्वणी
अनिल ठाणेकर
ठाणे : कोकणातील पारंपरिक लोककलेचा अनोखा ठेवा असलेल्या ‘कलगीतुऱ्या’चा थरार आता ठाणेकरांना अनुभवता येणार आहे. राम गणेश गडकरी रंगायतन येथे शुक्रवार, १७ जुलै, सायंकाळी ७.३० वाजता भव्य कलगीतुऱ्याच्या जंगी सामन्याचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमाबाबत लोककला रसिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या बहारदार सामन्यात कलगीवाले शाहीर संदीप मोरे आणि तुरेवाले शाहीर देवेंद्र झिमन यांच्यात सवाल-जवाब, हजरजबाबी फटकेबाजी, उत्स्फूर्त सादरीकरण आणि पारंपरिक लोककलेचा रंगतदार आविष्कार पाहायला मिळणार आहे. पारंपरिक कलगीतुऱ्याचा वारसा आधुनिक सादरीकरणातून अनुभवण्याची संधी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळणार आहे.
अतुल कदम आणि सुनील कदम यांच्या निर्मितीत होणाऱ्या या कार्यक्रमाचे आयोजन जयवंतदादा चव्हाण आणि सुधाकरभाई सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी विशेष नियोजन करण्यात आले असून, तिकिटांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता कार्यक्रम हाऊसफुल होण्याची शक्यता आयोजकांनी व्यक्त केली आहे. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे, माजी महापौर अशोक वैती, युवासेना अधिकारी ऋषिकेश माने, अभिनेते मंगेश देसाई, भाऊ कदम, गौरव मोरे, उद्योजक विकास दाभाडे तसेच समाजसेवक संदीप बिरवटकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
विशेष म्हणजे, कलगीतुऱ्याच्या इतिहासात प्रथमच १० भाग्यवान प्रेक्षकांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत. त्यामुळे कार्यक्रमाची उत्सुकता आणखी वाढली आहे. कोकणच्या मातीत रुजलेली ही समृद्ध लोककला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी आणि नव्या पिढीने तिचा वारसा जपावा, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. लोककलेची आवड असलेल्या प्रत्येकाने या सांस्कृतिक मेजवानीला उपस्थित राहून कलाकारांना उत्स्फूर्त दाद द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *