चिकणघर परिसरातील रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी 
कल्याण : कल्याण पश्चिमेतील चिकणघर परिसरातील रस्त्यांवर खड्डे पडले असून या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे  रस्त्यांवरील हे खड्डे तातडीने बुजवून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी हेल्पिंग हँड सामाजिक संस्थेने केली असून याबाबत संस्थेचे अध्यक्ष सचिन राऊत यांनी केडीएमसी आयुक्तांना पत्र दिले आहे.
काही दिवसांपूर्वी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होत असलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर रस्ते तातडीने दुरुस्त करण्यासाठी महानगरपालिकेकडे निवेदन दिले होते. त्यानंतर काही ठिकाणी रस्त्यांचे काम करण्यात आले. मात्र, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अवघ्या काही दिवसांतच पावसात ते रस्ते पुन्हा वाहून गेले आणि खड्ड्यांची समस्या पूर्वीपेक्षा अधिक गंभीर झाली आहे. याच कारणामुळे पुन्हा महानगरपालिकेकडे निवेदन देऊन संबंधित रस्त्यांची तातडीने, दर्जेदार आणि कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची मागणी संस्थेतर्फे करण्यात आली आहे. जेणेकरून नागरिकांना होणारा त्रास आणि अपघातांचा धोका कमी होईल.
चिकणघर परिसरातील संदीप हॉटेल ते मधुरीमा स्वीट्स या दरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्‌डे पडले असून रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या मार्गावर तीन ते चार शाळा असून दररोज हजारो शाळकरी वि‌द्यार्थी, पालक, ज्येष्ठ नागरिक तसेच इतर नागरिक या रस्त्याचा वापर करतात. रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांचा अंदाज येत नाही आणि त्यामुळे दुचाकीस्वार तसेच पादचाऱ्यांसाठी हा रस्ता अधिक धोकादायक ठरत आहे.
परिसरातील नागरिकांनी यापूर्वीही यासंदर्भात महानगरपालिकेकडे लेखी तक्रारी सादर केल्या आहेत. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. तरी या बाबीची तातडीने दखल घेऊन संदीप हॉटेल ते मधुरीमा स्वीट्स या मार्गावरील सर्व खड्डे त्वरित बुजवून रस्त्याची योग्य दुरुस्ती करण्याचे आदेश संबंधित विभागास देण्याची मागणी हेल्पिंग हँड सामाजिक संस्थेने केडीएमसी आयुक्तांकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *