एक लाखाहून अधिक किमतीची तिकिटे जप्त
कल्याण : टिटवाळा जवळील बनेली गाव येथे रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या ई तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या एका पाच मध्यस्थांच्या टोळीला रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांनी सोमवारी छापा टाकून अटक केली. या टोळीकडून एक लाख १६ हजाराची लांब पल्ल्याच्या एक्सप्रेसची ४८ ई रेल्वे तिकिटे जप्त करण्यात आली आहेत.
टिटवाळ्या जवळील बनेली गावात काही रेल्वेचे एजंट लांब पल्ल्याच्या गाड्यांचा ई तिकिटांचा काळाबाजार करत असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा अधिकाऱ्यांना गुप्तरित्या कळली होती. या माहितीची सत्यता तपासून झाल्यावर सोमवारी रेल्वे सुरक्षा बळाचे जवान, माहिती तंत्रज्ञान अधिकारी, तपासणी विभाग अशा विविध विभागाच्या पाच पथकांनी अचानक टिटवाळा बनेली येथे रेल्वे एजंटच्या कार्यालयावर छापा मारला. तेथे सुरू असलेला काळाबाजार थांबविला.
या कारवाईत मोहम्मद जावेद आलम अली अन्सारी (३३, रा. राजेश्वरी रेसिडेन्सी, बनेली, टिटवाळा), अफरोज आलम वजाहत अली (२९, रा. मंजिल राजेश्वरी, बनेली, टिटवाळा), जैद हैद्दर सिद्दीकी (२७, रा. वायले चाळ, टिटवाळा), मोहम्मद सलमान मन्नान (२३, रा. आम्रपाली इमारत, बनेली), अब्दुल सलाम मोमीन (२४, रा. ओमिया रेसिडेन्सी, बनेली) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून तीन हजार रूपये ते ५० हजार रूपयांपर्यंत रेल्वेची ई तिकिटे जप्त करण्यात आली आहेत. ही तिकिटे ते काळ्या बाजारात प्रवाशांना विकत होते. या कारवाईमुळे रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणारी एक मोठी टोळी कार्यरत असल्याचे उघड झाले आहे. या टोळीने आतापर्यंत किती तिकिटांचा काळाबाजार केला आहे याचा तपास पोलीस करत आहेत.