लातूर : काँग्रेसच्या ‘कातील पंजाची’ नजर आता तुमच्या आजच्या संपत्तीवरच नाही तर भविष्यात तुम्ही तुमच्या मुलांसाठी सोडून जाणाऱ्या संपत्तीवरही आहे. जर तुमच्याकडे दहा एकर शेती असेल तर त्यातील पाच एकर शेती काँग्रेस हडपणार आणि त्यांच्या व्होट बँकेमध्ये वाटप करणार असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.  नरेंद्र मोदी आज लातूरमध्ये भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेस जर सत्तेत आली तर ते पहिला देशवासियांच्या कमाईचे विश्लेषण करणार. त्यानंतर तुमच्या संपत्तीवर कब्जा करणार आणि त्यांच्या व्होट बँकेमध्ये त्याचं वाटप करणार. तुमच्याकडे जर 10 एकर शेती असेल तर तुमच्या मुलांना ती संपूर्ण शेती मिळणार नाही. त्यातील पाच एकर शेती ही काँग्रेस हडपणार. जर तुमच्याकडे दोन घरं असतील तर तुमच्या मुलांना त्यापैकी फक्त एकच घर मिळणार. तुम्ही तुमच्या मेहनतीच्या कमाई इतरांना देणार का?

काँग्रेसची नजर तुमच्या संपत्तीवर असल्याचं सांगत नरेंद्र मोदी म्हणाले की, तुमच्या मुलांसाठी सोडून जाणाऱ्या संपत्तीचे वाटपही ते करणार आहेत. आपण आपल्या मुलांसाठी कष्ठ करतो आणि संपत्ती मुलांसाठी सोडून जातो. मृत्यूनंतर आपल्या मुलांसाठी काही ना काही देतो. पण काँग्रेस आता त्यामध्येही अर्धी संपत्ती लुटणार आणि त्यांच्या व्होट बँकेमध्ये वाटप करणार. त्यामुळेच काँग्रेस देशात आता वारसा हक्क कायदा लागू करण्याची भाषा करतेय. काँग्रेस पार्टीच्या शाही परिवारने स्वतःच्या मुलांसाठी कोणती जाहगीर सोडली आहे? साठ वर्षांमध्ये ते गरिबीशिवाय काही देऊ शकले नाहीत.

पाच वर्षात पाच पंतप्रधान देण्याचं काँग्रेसचे धोरण

विरोधकांच्या इंडिया आघाडीवर टीका करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, इंडिया आघाडीचे पाच वर्षात पाच पंतप्रधान देण्याचं धोरण आहे. जे लोक प्रधानमंत्री हप्त्यात बनवण्याची इच्छा ठेवतात, ते काही करू शकत नाहीत. दरवर्षी नवीन पंतप्रधान देण्याची स्कीम त्यांनी सुरू केली आहे. लातूरकरांना मी विचारतो की असल्या लोकांना कणभर ही संधी देणार का?

ही निवडणूक सुधाकर श्रृंगारे यांना खासदार बनवण्याची नाही. हे मोठे ध्येय आणि लक्ष पूर्ण करण्याची निवडणूक आहे, सुधाकर श्रृंगारे यांना संसदेत पाठवून मला मजबूत करा असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं. मी देशातील लोकांना गॅरंटी देतो की ज्यांनी देशाला लुटलं आहे त्यांना धडा शिकवीन, ही मोदीची गॅरंटी आहे असा नरेंद्र मोदींनी विश्वास दिला.

भारतातला युवक वर्ग कायमच कौशल्यपूर्ण आणि बुद्धिमत्ताधारक राहिला आहे. मात्र काँग्रेसने भारतातील युवकांच्या स्वप्नांचा कधीही विचार केला नाही. काँग्रेस पक्षाने फक्त एका परिवाराचा विचार केला, मात्र मोदी देशातील सर्वसामान्य लोकांचा विचार करत आहे असं नरेंद्र मोदी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *