स्वाती घोसाळकर

मुंबई- मिशन टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे. अहमदाबादमध्ये झालेल्या बैठकीनंतर टीमची घोषणा करण्यात आली. भारताच्या मिशन वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची कॅप्टन्सी पुन्हा एकदा रोहीत शर्माकडेच कायम ठेवण्यात आली आहे. आयपीएलमध्ये रोहीतची मुंबई इंडियाकडील कॅप्टन्सी काढून ती हार्दिकला दिल्याने टीकचे मोहोळ उठले होते. पण निवडसमितीने पुन्हा एकदा रोहीत शर्मावरच विश्वास दाखविला आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा १५ जणांचा संघ निवडण्यात आला. आयपीएलमध्ये सर्वाधिक टीका ही हार्दिक पंड्यावर होती. मात्र रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी मात्र हार्दिकवर विश्वास ठेवला आणि उपकर्णधार म्हणून त्याची निवड या संघात करण्यात आली.

ऋषभ पंत, शिवम दुबे, संजू सॅमसन आणि युजवेंद्र चहल यांचे पुनरागमन झाले आहे. पण महत्वाचं म्हणजे के. एल. राहुल याची मात्र संघात वर्णी लागली नाही.

विकेट किपर म्हणून ऋषभ पंत आणि संजू सॅमसन या दोन विकेटकिपर बॅट्समनला संघात स्थान दिल्यामुळे राहुलचा पत्ता कट झाल्याचं बोललं जातंय. या वर्षीच्या आयपीएलमध्ये राहुलची कामगिरी समाधानकारक नव्हती. राहुलने आयपीएल २०२४च्या हंगामात ९ डावात ४२ च्या सरासरीने अवघ्या ३७८ धावाच केल्या आहेत. त्याचबरोबर तो आयपीएलच्या संघामधून फलंदाजी करताना सलामीला येतो. आणि सध्या टीम इंडियामध्ये सलामीची जागा रिक्त नाही. एकीकडे रोहित शर्मा तर दुसरीकडे शुभमन गिल आणि यशस्वी. त्यामुळे इथेही राहुलची संधी हुकली. आयपीएलच्या आधीच के. एल. राहुल हा दुखापतग्रस्त होता. आयपीएलमध्ये आल्यानंतरही त्याच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह कायम होतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे २०२२ला झालेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये सुद्धा राहुलची कामगिरी सुमार झाली होती. या सगळ्या गोष्टींचा विचार करता के.एल. राहुल वर्ल्डकपच्या संघाबाहेर असावा.

निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्या नेतृवखाली झालेल्या टीम निवडीमध्ये युजवेंद्र चहल, कुलदीप यादव आणि रवींद्र चहल यांच्याबरोबर फिरकी गोलंदाजीला बळ देण्यासाठी अक्षर पटेलला संघात घेतलं आहे. याशिवाय अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज जसप्रीत बूमराहच्या मदतीने भारताचा वेगवान मारा सांभाळतील. बीसीसीआईने शुभमन गिल, रिंकू सिंग , आवेश खान आणि खलील अहमद या चार राखीव खेळाडूंची यादीही जाहीर केली आहे जे संघासोबत प्रवास करतील. खेळाडूंची पहिली तुकडी २१ मेला अमेरिकेला रवाना होणार आहे.

टीम इंडियाचा संघ खालीलप्रमाणे : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (डब्ल्यूके), संजू सॅमसन (डब्ल्यूके), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. सिराज.

राखीव

शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आणि आवेश खान

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *