जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे मार्गदर्शन
अशोक गायकवाड
रत्नागिरी : मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम २०२६ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या उपस्थितीत सोमवारी राजकीय पक्षांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरणाबाबत माहिती देण्यात आली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.
जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांमधील मतदान केंद्रांमध्ये प्रस्तावित करण्यात आलेल्या बदलांच्या तपशिलानुसार, प्रसिद्ध यादीनुसार मतदान केंद्रांच्या संख्येत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार एखाद्या मतदान केंद्रावर १३०० पेक्षा अधिक मतदार असल्यास अतिरिक्त मतदान केंद्र निर्माण करणे अथवा संबंधित मतदारांचे कमी मतदारसंख्या असलेल्या केंद्रात समायोजन करणे आवश्यक आहे.
यानुसार २६३-दापोली विधानसभा मतदारसंघात १६७-पंढरी या मतदान केंद्रातील तुरेआळी हा विभाग वगळून तो १६५-पंढरी या मतदान केंद्राला जोडण्यात आला आहे. तसेच १७१-हर्णे मतदान केंद्रातील क्रिश्चनआळी आणि बौद्धवाडी हे दोन विभाग वगळून ते १७४-हर्णे या मतदान केंद्राला जोडण्यात आले आहेत. १५६-वणौशी त. नातू या मतदान केंद्राला जोडलेले सर्व मतदार व मतदार क्षेत्र सोंडेघर या महसुली गावातील असल्याने या मतदान केंद्राला आता ‘सोंडेघर’ असे नाव देण्यात येत आहे.
२६५-चिपळूण विधानसभा मतदारसंघात जुन्या इमारती मोडकळीस आल्याने तसेच काही ठिकाणी शाळा बंद झाल्यामुळे मतदान केंद्रांच्या स्थळांमध्ये बदल करण्यात आले आहेत. यामध्ये ९-पेढे कोष्टेवाडी, १३९-शिरगाव, १४०-शिरगाव आणि २४८-कसबा या मतदान केंद्रांचा समावेश आहे. जुनी शाळेची इमारत बंद झाल्याने २१-तिवडी, तर मतदारसंघातील अंतर अधिक असल्याने ९४-खडपोली या मतदान केंद्राच्या स्थळात बदल करण्यात आला आहे.
२६६-रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात इमारत निर्लेखित झाल्यामुळे मतदान केंद्रांच्या स्थळांमध्ये बदल करण्यात आला आहे. संबंधित मतदान केंद्रांची नावे रत्नागिरी नगरपरिषद वॉर्ड क्र. ८ आणि रत्नागिरी नगरपरिषद वॉर्ड क्र. ९ अशी आहेत.
२६७-राजापूर विधानसभा मतदारसंघात इमारत निर्लेखित झाल्यामुळे ३२९-प्रिंदावन या मतदान केंद्राच्या स्थळात बदल करण्यात आला आहे.
या बैठकीला प्रशांत साळुंखे, राजाराम रहाटे, सुफियान जयगडकर, दिलावर गोदड, प्रशांत सुर्वे आणि सलील डाकवे (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे), सनीफरखान गवाणकर (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरद पवार), राहुल पंडित (शिवसेना), ओंकार फडके (भारतीय जनता पार्टी) आणि खलील वस्ता (आम आदमी पार्टी) उपस्थित होते.
