रमेश औताडे
मुंबई : अनुसूचित जातींमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न म्हणजे संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्यागाचा आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा अपमान आहे. अशा प्रकारचे प्रयत्न आंबेडकरी समाज कदापि सहन करणार नाही, असा निर्धार व्यक्त करीत आरक्षणाच्या संरक्षणासाठी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या वतीने विशाल मोर्चा काढण्यात आला.
अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या हक्कासाठी आणि समाजाची एकजूट कायम ठेवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. आरक्षणाच्या माध्यमातून वंचित समाजाला मिळालेल्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण झाले पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा आयोजित करण्यात आला. कविता गाडगे, सागर वानखडे, सुनंदा कांबळे, प्रफुल्ल इंगोले, नंदा गायकवाड, वैशाली बाराथे, सुलभा बुचुंदे, मनोरमा ढोले, अनिता गाडगे, शंकुतला मोरे, वैशाली चव्हाण, मिलन दनाने, मिना पाटिल, वनिता नागले, मनिषा कांबळे सह मोठ्या संख्येने महिला पुरूष सहभागी झाले होते.
आरक्षण हा केवळ सरकारी नोकरी किंवा शिक्षणातील लाभ नसून सामाजिक न्याय आणि समान संधीचा घटनात्मक अधिकार आहे. त्यामुळे आरक्षणाच्या प्रश्नावर आंबेडकरी समाजाने एकजुटीने भूमिका घेऊन आपले हक्क अबाधित ठेवण्यासाठी संघर्ष करावा, असे आवाहन मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आले.
