नगरसेवक महेश गायकवाड विकासकावर संतापले;
३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या गंगाराम राठोड यांचे घर पाडले
कल्याण : कल्याण पूर्वेतील कैलास नगर परिसरात गॅस कंपनी जवळ सोसायटीच्या विकासकामादरम्यान एका गरीब कुटुंबाच्या घराची कथितरित्या जबरदस्तीने तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. सोसायटीच्या पुनर्विकासाच्या नावाखाली विकासक संतोष केंगळे यांनी गंगाराम राठोड यांच्या घराची तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. राठोड कुटुंब गेल्या ३० वर्षांहून अधिक काळापासून या घरात वास्तव्यास असल्याचे सांगण्यात आले. तोडफोडीच्या कारवाईत घरातील संसारोपयोगी साहित्याचेही नुकसान झाल्याने गरीब कुटुंबाचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप आहे. घटनेची माहिती मिळताच शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेत विकासकाच्या कारवाईबाबत तीव्र संताप व्यक्त केला.
“मी कोणत्याही गरीबावर अन्याय होऊ देणार नाही. विकासाच्या नावाखाली गरीबांच्या घरांवर कारवाई करून त्यांच्या हक्कांवर गदा आणली जात असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही,” अशी भूमिका गायकवाड यांनी घेतली. तसेच विकासक आणि त्यांना कथितरित्या राजकीय पाठबळ देणाऱ्यांच्या दादागिरीविरोधात आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे न्यायाची मागणी करणार असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले. पीडित गंगाराम राठोड आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा, तसेच संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, विकासक संतोष केंगले यांनी महेश गायकवाड यांनी आपल्यासोबत मारहाण केल्याचा तसेच जातिविषयक शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. घटनेमुळे परिसरात नाराजीचे वातावरण असून, पोलीस आणि प्रशासनाकडून या प्रकरणात कोणती कारवाई केली जाते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. बातमी लिहेपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *