जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
ठाणे : महाराष्ट्र कोणी हातात आणून दिलेला नाही, अनेक हुतात्मे यासाठी झाले. महाराष्ट्र हा पोवाड्यांनी गाजला, डफावार मुंबई पेटवली. महाराष्ट्र कधी दिल्लीसमोर झुकला नाही पण आज गुजरातची भरभराट करण्यासाठी महाराष्ट्राचा गळा घोटला जातोय असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.
ते ठाण्यातील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला. लोकसभेसाठी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडले आहे. या दोन्ही टप्प्यात किती मतदान झाले याची माहिती निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली असून निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीवर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतला आहे.
आव्हाड यांनी यासंदर्भात ट्विट देखील केले आहे. पहिल्या टप्यानंतर ११ दिवसांनी, दुसऱ्या टप्प्यानंतर ४ दिवसांनी मतदानाची अंतिम टक्केवारी निवडणूक आयोगाने जाहीर केली. निवडणूक आयोगाने इतका उशीर का केला?
असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. हे सर्व संशयास्पद आहे, ईव्हीएम बाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. निवडणूक आयोग मतदानाचा आकडा का देत नाही? टक्केवारीच का? देते असा प्रश्न उपस्थित करून यासंदर्भात निवडणूक आयोगाने याचा खुलासा करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
मी जे काही बोलतोय, दाखवतोय पुराव्यानिशी दाखवत असल्याचेही आव्हाड यांनी सांगितले. हिंदुत्वचा त्यांचा मार्ग फेल गेला आहे. इतर देशात लोकशाहीबद्दल राज्यकर्त्यांना चिंता असते मात्र इथे काहीच नसून निवडणूक आयोग कटपूतली असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासंदर्भात बोलताना आव्हाड म्हणाले, त्यांनी त्यांचा वेगळा मार्ग स्वीकारला आहे यावर मला काही बोलायचं नाही. शरद पवार हा माझा बाप असल्याचे आव्हाड म्हणाले. ठाण्यात आमचे सर्व फोटो झाकले गेलेले आहेत मात्र अनेक ठिकाणी मुख्यमंत्र्यांचे फोटो झळकत आहेत, निवडणूक आयोग खोटं काम करत असल्याचा आरोप आव्हाड यांनी यावेळी केला.