ठाण्यात म्हस्के, कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे, नाशिकमध्ये हेमंत गोडसे लढणार

अनिल ठाणेकर

ठाणे : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या ठाण्याच्या जागेवर अखेर शिंदेंच्या शिवसेनेने आपला हक्क कायम राखला आहे. शिंदेकडूंन नरेश म्हस्क यांना उमेदवारी जाहिर झाली आहे. ते उद्धव ठाकरेंच्या सेनेच्या राजन विचारेविरुद्ध लढतील. अपेक्षेप्रमाणे कल्याण मतदार संघातून विद्यामान खासदार श्रीकांत शिंदे तर नाशिकमधून हेमंत गोडसे यांनी उमेदवारी पुन्हा देण्यात आली आहे. आजच्या या तिकीटवाटपामुळे शिंदे सेनेचे आतापर्यंत १४ उमेदवार घोषित झाले आहेत. याउलट महाविकास आघाडीतील उद्धव सेना एकुण २२ जागा लढवित आहे. शिवसेनेत फुट पडण्याआधी भाजपासोबतच्या युतीवेळी शिवसेनेने २३ जागा लढवून लोकसभेच्या १८ जागा जिंकल्या होत्या. या १८ पैकी १३ खासदार शिंदेच्या सोबत गेले होते. निकाल लागेल तेव्हा लागेल. पण तिकीट वाटपात मात्र उद्धव ठाकरे यांनी कागदावरच्या लढाईत शिंदेंच्या तुलनेत बाजी मारली आहे.

  लोकसभेसाठी पालघरचा एकमेव अपवाद सोडला तर महायुतीतील तिढा आता सुटला आहे. शिंदेसेनेच्या वाट्याला लोकसभेच्या १४ जागा आल्या आहेत. भाजपाने २८ उमेदवार घोषित केले आहेत. तर राष्ट्रवादी चार जागांवर तर महादेव जानकरांचा ‘रासप’ एक जागांवर निवडणूक लढत आहे. पालघरच्या जागेवर शिंदेंच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांचे तिकीट नक्की मानले जात आहे. पण ते शिंदेसेनेकडून निवडणूक लढवणार की भाजपाकडून ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. किंवा शेवटच्या क्षणी हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षासाठी ती जागा सोडली जाऊ शकते असेही सुत्रांने सांगितले. पण ती जागा जर एकनाथ शिंदे यांच्याकडेच राहीली तर मग शिंदेच्या सेनेचे १५ उमेदवार रिंगणात असतील.

दरम्यान, महायुतीच्या जागावाटपात ठाण्याचा बालेकिल्ला आपल्याकडे राखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांना यश आले आहे.

भाजप आणि  शिवसेना शिंदे गट शेवटच्या क्षणापर्यंत ठाण्यावरील आपापल्या दाव्यावर ठाम होते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्याचा बालेकिल्ला राखण्यात यशस्वी होतात की नाही, अशी चर्चा रंगली होती. ठाणे मतदारसंघ भाजपकडे जाणार असल्याचं चित्र निर्माण झाले होते. भाजपने मतदारसंघात घेण्यासाठी जोर लावला होता. भाजपकडून माजी खासदार विनय सहस्रबुद्धे, आमदार संजय केळकर, माजी खासदार संजीव नाईक यांची नावे चर्चेत होती तर. शिवसेनेकडून माजी आमदार रविंद्र फाटक,  आमदार प्रताप सरनाईक, माजी महापौर मिनाक्षी शिंदे व माजी महापौर नरेश म्हस्के यांची नावे चर्चेत होती. यामुळे भाजप आणि शिवसेनेतील तिढा काही सुटता सुटत नव्हता. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाणे लोकसभा आपल्याकडे राखण्यात यश आले.

ठाणे जिल्ह्यातील कल्याण व ठाणे अशा दोनही जागा ना. एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे खेचून आणल्या आहेत. आता कल्याण लोकसभा मतदारसंघात ठाकरे सेनेच्या वैशाली दरेकर राणे यांच्याविरोधात शिंदे सेनेचे विद्यमान खासदार डाॅ श्रीकांत शिंदे यांचा मुकाबला होईल तर ठाणे लोकसभा मतदारसंघातही ठाकरे सेनेचे विद्यमान खासदार राजन विचारे यांच्याविरोधात शिंदे सेनेचे, माजी महापौर नरेश म्हस्के यांचा सामना होईल. दोन्ही जागांवर ठाकरे विरुद्ध शिंदे अशी थेट होणारी लढत ही दोन्ही गटाच्या अस्तित्वाची असणार आहे. आता खरी शिवसेना कोणती व कोणाची हे कल्याण व ठाणे या मतदारसंघातील मतदार दाखवून देणार आहेत.

सन १०८९ आणि १९९१ असे सलग दोनवेळा एकीकृत ठाणे लोकसभेचे नेतृत्व भाजपचे खासदार रामचंद्र कापसे यांनी केले होते. असे असतानाही शिवसेनेची ताकद वाढल्याचे कारण देत एकीकृत ठाणे लोकसभा मतदारसंघ दिवंगत शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी १९९६ साली भाजपकडून अक्षरशः खेचून घेतला. त्यानंतर झालेल्या आतापर्यंत निवडणूकीत १९९६ ते २००८ पर्यंत शिवसेनेचे खासदार दिवंगत प्रकाश परांजपे व आनंद परांजपे यांनी एकीकृत ठाणे लोकसभेचे नेतृत्व केले होते. अपवाद म्हणजे २००९ साली डॉ. संजीव नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार म्हणून निवडून आले होते.  २०१४ व २०१९ असे दोनदा खासदार राजन विचारे यांनी शिवसेनेकडून ठाणे लोकसभेचे प्रतिनिधित्व केले आहे.

नरेश म्हस्के हे मुख्यमंत्री शिंदे यांचे निष्ठावंत शिल्लेदार समजले जातात.ते दोन वेळा स्विकृत सदस्य म्हणून पालिकेत होते. २०१२ मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर स्थायी समिती सदस्य, सभागृह नेतेपदावरही त्यांनी काम केले. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज झाले होते. अखेर ना. एकनाथ शिंदे यांनी नरेश म्हस्के यांच्या नाराजीची दखल घेत, भाजपाला दिलेले आश्वासन मोडून नरेश म्हस्केंना स्थायी समितीचे सभापतीपद दिले. २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत म्हस्के पुन्हा निवडून आले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर विश्वास टाकत सभागृह नेतेपद दिले.त्यानंतर नरेश म्हस्के यांना महापौरपदाची जबाबदारीही एकनाथ शिंदे यांनी दिली. शिवसेना फुटीनंतर नरेश म्हस्के हे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर राहिले आणि शिंदे सेनेचे प्रवक्ते म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *