नवी दिल्ली : ज्ञानेश कुमार आणि बलविंदर संधू या दोन अधिकाऱ्यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी ही माहिती दिली. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना नवनियुक्त आयुक्त मदत करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन दास यांच्या समितीने या दोन्ही नावांना संमती दिल्याची माहिती आहे.
अरूण गोयल यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजीनामा दिल्यानंतर एकून रिक्त पदांची संख्या दोन झाली होती. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने पावलं उचलून या निवडी केल्या आहेत.
यासंबंधीची माहिती देताना अधीर रंजन चौधरी म्हणाले की, या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, अर्जुन राम मेघवाल आणि माझ्या समितीने या नियुक्त्या केल्या आहेत. मीटिंगमध्ये मी एक छोटी यादी मागितली होती. त्यावेळी छोटी यादी सादर करावी असे सांगण्यात आले. कारण निवडीपूर्वी छोट्या याद्या बनवल्या जातात. त्यामुळेच मी ती यादी मागितली होती. ती यादी मला लवकर मिळाली असती तर दिल्लीत पोहोचल्यावर मला उमेदवारांची माहिती मिळाली असती. पण ती संधी मला मिळू शकली नाही.
एकूण 212 नावांची यादी देण्यात आली होती
अधीर रंजन चौधरी म्हणाले की, मला दिलेल्या यादीत 212 नावे होती. मी काल रात्रीच दिल्लीत आलो. सकाळी 12 वाजता निवड बैठकीला जाण्यापूर्वी ही सर्व नावे जाणून घेणे कठीण होते. अशा परिस्थितीत ही 212 नावे बघून काय उपयोग? आमच्या समितीत पंतप्रधान आणि गृहमंत्री आहेत आणि मी एकटाच विरोधी पक्ष आहे. सुरुवातीपासून या समितीतील बहुमत सरकारच्या बाजूने आहे. अशा परिस्थितीत सरकारला जे हवे ते होईल. सरकारच्या इराद्यानुसार निवडणूक आयुक्तांची निवड केली जाईल.

अरुण गोयल यांच्या नियुक्तीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते की त्यांची नियुक्ती ही घाईगडबडीत करण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली होती. त्यांच्या राजीनाम्यानंतर बलविंदर संधू आणि ज्ञानेश कुमार या दोन व्यक्तींची निवड करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *