ठाणे प्रीमियर लीग टी – २० क्रिकेट स्पर्धा
ठाणे : सामनावीर ठरलेल्या निखिल पाटीलचे नाबाद दमदार शतक, साहिल गोडेच्या ९१ धावा आणि गोलंदाजांच्या एकत्रित चांगल्या कामगिरीच्या जोरावर एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबच्या ब संघाने ए.टी स्पोर्ट्सचा १९८ धावांनी दणदणीत पराभव करत महाराष्ट्र माझा सेवा संस्था आयोजित ठाणे प्रीमियर लीग टी – २० क्रिकेट स्पर्धेत पहिला विजय मिळवला. फलंदाजांच्या आक्रमक खेळामुळे २५८ धावांचा पर्वत उभा केल्यावर एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ब संघाच्या गोलंदाजांनी ए,टी स्पोर्ट्सला ६० धावांवर गुंडाळत विजयावर शिक्कामोर्तब केले.
दादोजी कोंडदेव स्टेडीयमवर सुरु असलेल्या स्पर्धेतील सामन्यात प्रथम फलंदाजी करताना निखिल पाटील आणि साहिल गोडेने ए.टी. स्पोर्ट्सच्या गोलंदाजांचा अक्षरशः फडशा पाडला. निखिलने नाबाद ११८ धावांची खेळी केली. ४८ चेंडूत शतक साकारणाऱ्या निखिलने ९ चौकार आणि तेवढेच षटकार ठोकले. साहिलने ३६ चेंडूत ९१ धावांची बहुमूल्य खेळी साकारताना १२ चौकार आणि पाच षटकार मारले. धृमील मटकरने नाबाद ३० धावा केल्या. या डावात योगेश सावंतने दोन, अश्विन यादव आणि सिद्धार्थ यादव यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला. त्यानंतर मोठ्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या ए टी स्पोर्ट्सच्या फलंदाजाना खेळपट्टीवर टिकू न देता गोलंदाजांनी विजयाचा मार्ग मोकळा केला. संक्षिप्त धावफलक : एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ( ब संघ ) : २० षटकांत ४ बाद २५८ ( निखिल पाटील नाबाद ११८, साहिल गोडे ९१, धृमील मटकर नाबाद ३०, योगेश सावंत ४-२५-२, अश्विन यादव ४-४९-१, सिद्धार्थ यादव ४-५२-१) विजयी विरुद्ध ए टी स्पोर्ट्स : १२.१ षटकात सर्वबाद ६० ( कौशिक शुक्ला १८, शिवम घोष १५ , हेमंत बुचडे २-४-२, अमित पांड्ये २-७-२,अर्जुन शेट्टी २-७-२, धृमील मटकर १.१ – २-१, अमन खान १-४-१,नंदन कामत३-१३-१.) सामनावीर – निखिल पाटील.