पुणे: राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवारांसोबत जाणारे आमदार निलेश लंके यांनी लोकसभा निवडणूकीच्या धामधुमीत आपली वेळ बदलत तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कार्यालयात पक्षाध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सोबत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपला राजकीय प्रवास निश्चित केलाय. पक्षांतर बंदीची टांगती तलवार टाळण्यासाठी या पत्रकार परिषदेत कुठेही लंके हे शरद पवार गटात सामिल झाले आहेत असे कुणीही म्हटले नाही. केवळ प्रतिकात्मक त्यांना तुतारी भेट देण्यात आली. त्याआधी खासदार अमोल कोल्हे आणि मनसेला सोडचिठ्ठी दिलेले माजी नगरसेवक वसंत मोरे हे दोघेही पक्ष कार्यालयात दाखल झाले. निलेश लंके आणि वसंत मोरे हे दोघेही तुतारी फुंकून, राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार अशी शक्यता होती. त्याप्रमाणे निलेश लंके यांनी प्रवेश केला, मात्र वसंत मोरे यांनी प्रवेश न करता, ते माघारी परतले.
पारनेरचे आमदार निलेश लंके हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवारांसोबत गेले होते. ते अहमदनगर लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र हा मतदारसंघ महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला गेला आहे. त्यामुळे निलेश लंके हे अजितदादांची साथ सोडून शरद पवार गटात सहभागी झाले.
दुसरीकडे मनसे सोडलेले फायरब्रँड नेते वसंत मोरे हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कार्यालयात दाखल झाले. त्यामुळे वसंत मोरे हे सुद्धा आता शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता होती, पण त्यांनी प्रवेश केला नाही.
वसंत मोरे प्रवेश न करताच माघारी
मी पक्षप्रवेशासाठी आलेलो नाही. मला सुप्रियाताईंनी आजची वेळ दिली होती, त्यामुळे मी आलो होतो. काँग्रेसच्या मोहन जोशी यांच्याशी चर्चा केली, शिवसेना नेत्यांशी पण केली. पुण्यात एक वेगळा प्रयोग होऊ शकतो. कसब्याची पुनरावृत्ती करायची असेल तर त्याला वसंत मोरे कशाप्रकारे उमेदावर असू शकतो हे सांगायला मी शरद पवारांकडे आलो होतो, असं वसंत मोरे यांनी सांगितलं.
मी शरद पवारांना सांगितला आहे मी लोकसभेसाठी इच्छुक आहे. ते महाविकास आघाडीतील मोठे नेते आहेत ते इतर मोठ्या नेत्यांना देखील सांगू शकतात समजू शकतात. पुढील दोन दिवसात मी माझी भूमिका स्पष्ट करेन, असं वसंत मोरे म्हणाले.
वसंत मोरेंचा मनसेला जय महाराष्ट्र
मनसेचे नेते वसंत मोरे यांनी दोन दिवसापूर्वीच पक्षाला सोडचिठ्ठ दिली. वसंत मोरे हे पुण्यातून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. वसंत मोरे यांनी मनसेला रामराम केल्यावर ते कोणत्या पक्षात जाणार याबाबतची उत्सुकता होती. अनेक पक्षांनी वसंत मोरे यांच्याशी संपर्क केला होता. वसंत मोरे कोणत्या पक्षात जाणार याबाबत अनेक तर्क लढवले जात होते. मी सगळं जाहीर करेन असं वसंत मोरेंनी राजीनामा देताना सांगितलं होतं.