ठाणे : एकीकडे देशाला वाचवायला, लोकशाहीला पुढे नेण्यासाठी आणि विकास करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. तर, दुसरीकडे देश बुडवायला निघालेली इंडीया आघाडी आहे. देशभक्त त्यांना थारा देणार नाहीत. त्यामुळेच मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात केले. तसेच पप्पु आधीच फेल झाला असून त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा फेल करतील, असे सांगत त्यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली.
ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमदेवार नरेश म्हस्के यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काढलेल्या मिरवणुकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे, राहुल गांधी आणि इंडीया आघाडीवर टीका केली. २०१४ पूर्वी देशात भ्रष्टाचार, दंगली आणि बाॅम्बस्फोट घडत होते. पण, त्यानंतर एकदाही बाॅम्बस्फोट करण्याची कुणाची हिमंत झाली नाही. कारण, भारताकडे डोळे वटारून पाहिले तर घरात घुसून मारु असा इशारा मोदींनी दिला. त्यामुळे पुन्हा एकदा मोदी पंतप्रधान होणार आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
घरात बसून किंवा फेसबुक लाईव्ह करून काम करता येत नाही. त्यासाठी जमिनीवर उतरुन काम करावे लागते. गेल्या दोन वर्षांपासून मी जमिनीवर उतरुन काम करतोय. याआधीही मीच काम करत होतो पण, त्याचे श्रेय दुसरे घेत होते, असे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली. बाबासाहेबांचे संविधान बदलणार असे विरोधकांकडून बोलले जात असून ते चुकीचे आहे. संविधान बदललेले जाणार नाही. देशात संविधान दिवस साजरा करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. तर, बाबासाहेब आंबेडकर यांना निवडणुकीत पाडण्याचे काम काँग्रेसने केले, असेही ते म्हणाले.
तुम्ही मागच्या उमेदवाराला मताधिक्य देण्याचे काम काम केले. त्याच्यासाठी मेहनत घेतली. खरे तर त्या उमेदवाराचे काम करायला कार्यकर्ते तयार नव्हते. त्यामुळे मीच उमेदवार असे समजून मतदान करा, असे मला सर्वांना सांगावे लागले, असा टोला लगावत या निवडणुकीत मागचे सर्व विक्रम मोडीत काढण्याचे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व कार्यकर्त्यांना केले. तसेच आपण उमेदवार या भावनेने काम करून विरोधकांच्या चारही मुंड्या चित करा परत, विरोधी पक्षाने ठाण्याचे नाव घेत कामा नये, असेही ते म्हणाले.