नीरा : शेतमाल पिकवणारा शेतकरी टिकला पाहिजे, त्याच्या मालाला योग्य तो भाव मिळायला हवा; मात्र सध्याचे मोदी सरकार शेतमाल पिकवणाऱ्याला महत्त्व देत नाही, तर फक्त खाणाऱ्यांना महत्त्व देते. त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. त्यासाठी शेतकऱ्याला महत्त्व देऊन त्याच्या मालाला चांगला भाव देणाऱ्या लोकांना निवडून द्या, असे आवाहन माजी कृषिमंत्री खा. शरद पवार यांनी केले आहे.
पुरंदर तालुक्यातील नीरा येथे गुरुवारी सुप्रिया सुळे यांच्या निवडणूक प्रचारासाठी झालेल्या सभेमध्ये पवार यांनी मोदी सरकारवर आणि त्यांनी राबविलेल्या धोरणांवर सडकून टीका केली.
जे काम करतात त्यांना प्रोत्साहन देणे ही जबाबदारी आपली आहे. ते काम तुम्ही करा. त्यांना पुन्हा संसदेत पाठवणे हे आपले कर्तव्य आहे, असे म्हणत सुप्रिया सुळे यांना मत देण्याचे आवाहन पवारांनी केले.
सुप्रिया सुळे यांनीदेखील सरकारच्या धोरणांवर टीका केली. इथेनॉलबाबत जे धोरण राबवले त्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला ३०० रुपयांनी कमी भाव मिळाल्याचे म्हणत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली, तर यापुढे सर्व निवडणुका सर्व ताकदीनिशी लढवल्या जातील. ग्रामपंचायतीपासून विधानसभा त्याचबरोबर सहकारातील साखर कारखाने व जिल्हा बँकेची निवडणूकदेखील आपण लढवणार असल्याचे म्हणत त्यांनी अजित पवार यांना आव्हान दिले. लोकांनी कोणाच्या धमक्यांना घाबरू नये. जे धमक्या देतात त्यांना सांगा, विधानसभा लांब नाही. तिथे दाखवून देऊ, असे म्हणत त्यांनी अजित पवार यांना टोला लगावला.