नरेश म्हस्केंनी भरला उमेदवारी अर्ज भरला
अनिल ठाणेकर
ठाणे : ठाण्यासहीत शिवसेना कुणाची याचा फैसला करणाऱ्या ठाणे लोकसभा मतदार संघात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांच्या उपस्थितीत
जोरदार शक्तिप्रदर्शन करीत महायुतीचे शिवसेना पक्षाचे उमेदवार नरेश गणपत म्हस्के यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी खासदार डॉ श्रीकांत शिंदे, लता एकनाथ शिंदे, मिनाक्षी शिंदे, माजी मंत्री, आमदार गणेश नाईक, माजी खासदार आनंद परांजपे, माजी खासदार संजीव नाईक, माजी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, आमदार मंदा म्हात्रे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर,
आमदार गीता जैन, आमदार ॲड. निरंजन डावखरे, माजी आमदार श्री. रविंद्र फाटक, भाजपाचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, मनसे नेते अभिजीत पानसे, हरी माळी, आरपीआय (आठवले गट) चे ठाणे जिल्हाध्यक्ष भास्कर वाघमारे, माजी महापौर मिनाक्षी शिंदे, भाजपाचे संदीप लेले, भाजपाच्या ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा स्नेहलता पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भरण्यात आला. यावेळी महायुतीचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारा ठाणे जिल्हा असून तो धर्मवीर आनंद दिघेंचाही जिल्हा आहे. धर्मवीरांना साजेसे काम आपल्याला करायचे आहे. बाळासाहेबांचे आशिर्वाद आपल्या पाठिशी आहेत. त्यामुळे महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकजुटीने काम करतील आणि विरोधक चारीमुंड्या चीत होतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्याचा संकल्प लोकांनी केला आहे. तुमचा ठाणेकर या राज्याचा मुख्यमंत्री आहे. केवळ ठाण्यातच नाही तर संपूर्ण राज्यात कधी नव्हे इतकी विकास कामे केली आहेत. आपले सरकार येण्यापूर्वी सणांवर बंदी होती. घरात बसून सरकार चालवता येत नाही. फेसबुक लाईव्हने सरकार चालत नाही, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंवर केली. अहंकारामुळे राज्य अधोगतीला चालले होते. याविरोधात आपण उठाव केला. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेंच्या विचारांचे सरकार आपण स्थापन केले. मागील दोन वर्षात राज्यात प्रचंड काम झाले आहे. हे काम मतदारांपर्यंत पोहोचवायचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना केले.
आजची प्रचंड गर्दी पाहता नरेश म्हस्के यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले आहे. नरेश म्हस्के यांना मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत आहे. यंदाची निवडणूक ही विकासाची निवडणूक असून देशाला पुढे नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना डोळ्यासमोर पराभव दिसत असल्याने आता पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात नवी टुम काढली आहे. मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर संविधान बदलणार असा आरोप करत आहेत. मात्र जोवर चंद्र आणि सूर्य आहेत तोवर बाबासाहेबांचे संविधान कोणी बदलणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
म्हस्केंच्या रॅलीत गुंडांची फ्रीस्टाईल बॉक्सिंग
एरव्ही उमेदवारी अर्ज भरताना रॅलीत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, लेझिम, ढोल ताशे आदींचा भरणा असतो. पण नेरश म्हस्के यांच्या रॅलीत दोन गुंडांची फ्रीस्टाईल बॉक्सिंग चर्चेचा विषय ठरली. समाजमाध्यमावर गुंडांची फ्रीस्टाईल मारामारी प्रचंड व्हायरल झाली. म्हसकेंची रॅली कांग्रेस कार्यालयाजवळ आली असता, अजय पासी, सिद्धार्थ उर्फ सिधू अभंगे यांच्यात ही जोरदार हाणामारी झाली.
(अधिक वृत्त पान ३ वर)