अनिल ठाणेकर

ठाणे : कासारवडवली राममंदिर या तलावाचे सुशोभीकरण करून त्याठिकाणी संगीत कारंजे बसविण्यासाठी निधी देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. यानंतर या कामासाठी राज्य सरकारकडून १५ कोटींचा निधी ’महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांचा विकास“ या योजने अंतर्गत देण्यात आला. विशेष म्हणजे या प्रकल्प खर्चाचा १०० टक्के हिस्सा राज्य शासनाचा राहणार असल्याने राज्य सरकारच्या निधीतून हे काम होणार आहे. आता या तलावाचे सुशोभीकरण करण्याच्या कामासाठी महापालिकेकडून निविदा प्रक्रिया होऊन ठेकेदाराला कार्यादेश देण्यात आला असून या वर्षाच्या अखेरपर्यंत हे काम पूर्ण होईल, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील घोडबंदर परिसरातील कासारवडवली राममंदिर येथील तलावावर काळे दगड वापरून घाटांचे बांधकाम करण्यात येणार असून त्या ठिकाणी संगीत कारंजे बसवून सुशोभीकरण करण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा प्रताप सरनाईक यांच्या शुभहस्ते पार पडला.
ठाणे शहर हे तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. परंतू, या तलावांचे सुशोभिकरण करून, जतन करून सांस्कृतिक वारसा जपणे गरजेचे आहे. आ. प्रताप सरनाईक यांच्याच संकल्पनेतून ठाण्यातील उपवन तलावाजवळ बनारस घाटाच्या धर्तीवर उपवन घाट बनविण्यात आला असून तेथे अनेक धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम वर्षभरात होतात. तेथे संस्कृती युवा प्रतिष्ठानकडून दरवर्षी होणार्या ’उपवन आर्ट फेस्टिवल“ला लाखो नागरिकांचा प्रतिसाद मिळतो. त्यामुळे कासारवडवली राममंदिर येथील तलावावर ’उपवन घाटाप्रमाणे बनारस घाटा“च्या धर्तीवर काळे दगड वापरून घाट बांधले जावे अशी संकल्पना असून जेणेकरून या घाटांचा उपयोग धार्मिक कार्यक्रमासाठी होईल. ठाणे शहरामध्ये सर्व जाती-पंथाचे लोक गुण्या-गोविंदाने राहतात. श्री गणेशोत्सव, नवरात्र उत्सव, छटपूजा यासह हिंदू धर्मातील सर्व उत्सव करण्यासाठी लोक तलावाजवळ जमत असल्याने येथे चांगला घाट बांधण्यात येईल. तसेच तलावात म्युझिकल फाऊंटन लावले जातील व त्यावर लाईट इफेक्ट्स देण्यात येतील. संगीत कारंज्याचे म्हणजेच म्युझिकल फाऊंटनचे दररोज सायंकाळी ’लेझर शो“ ठेवले जातील. जे पाहण्यासाठी परिसरातील नागरिक आणि पर्यटकही येऊ शकतील व त्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल, असेही प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
असे होणार तलाव सुशोभीकरण
या तलावामधील शक्य होईल तितका गाळ काढला जाईल आणि तलाव स्वच्छ केले जाईल. तलावातच विसर्जन व इतर धार्मिक विधी होत असल्याने तलावाची योग्य ती स्वछता वर्षभर राहत नाही. त्यामुळे या तलावाच्या जवळ धार्मिक विधी व विसर्जन करण्यासाठी छोटा २० बाय ४० फुटांचा वेगळा पॉन्ड तयार केला जाईल. तिकडे पायऱ्या बनवल्या जातील. म्हणजे त्या वेगळ्या पॉन्ड मध्येच विसर्जन आणि सर्व धार्मिक कार्यक्रम नागरिक करू शकतील व मुख्य तलाव हा सुरक्षित, स्वच्छ राहील, मुख्य तलावात कोणी उतरणार नाही. तलावाच्या परिसरात निसर्ग रम्य वातावरण तयार केले जाईल. तलावाच्या आजूबाजूला मोकळ्या जागेत चांगले गार्डन तयार केले जाईल. या तलावाचे सुशोभीकरण केले जात असताना संरक्षक भिंत बांधण्यात येणार असून संरक्षक रेलिंग लावण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला, नागरिक याना बसण्यासाठी गजेंबौ, जॉगिंग ट्रॅक बनविण्यात येणार आहे तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी बसविण्यात येणार आहे.
याप्रसंगी माजी नगरसेवक सिध्दार्थ ओवळेकर, नम्रता घरत, साधना जोशी, शिवसेना विधानसभा समन्वयक साजन कासार, विधानसभा उपशहरप्रमुख कृष्णा भोईर, विभागप्रमुख दिलिप ओवळेकर, रवी घरत, विभाग समन्वयक राजेंद्र पाटील, महेश करकेरा, उपविभाग प्रमुख शिवाजी शिंदे, श्री. सुनील मोरे, शाखाप्रमुख प्रदीप पाटील, गिरीधर कांबळे, संजय राऊत, देवानंद भोईर, महिला विभाग संघटक रोहिणी ठाकूर, प्रियांका मसुरकर, महिला उपविभाग संघटक निर्मला कांबळे हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *